"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:16 PM2024-02-25T19:16:06+5:302024-02-25T19:17:13+5:30

"पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत."

a whole political motive behind it Jarange went to Sagar bungalow, Gunaratn Sadavarte made a big demand in the name of Sharad Pawar | "...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

"...या मागे संपूर्ण राजकीय हेतू"; जरांगे 'सागर'कडे निघाले, सदावर्ते यांनी शरद पवारांचं नाव घेत मोठी मागणी केली!

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या काही दिवसांपासून शांतते उपोषण करत असलेले मोज जरांगे आज अचानक आक्रमक झाले. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. "आपल्याला बदनाम करायचे, आपल्याला सलाइनमधून विष द्यायचे अथवा आपले एन्काउंटर करायचे, देवेंद्र फडणवीसांचे स्वप्न आहे, असे देवेंद्र फडणवीसांना वाटते." एवढेच नाही तर, काही लोकांना पुढे करून आपल्याला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. संपवण्याचे कटकारस्थान होत आहे. यामुळे मी आता मुंबईतील सागर बंगल्यावर येतो', असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. या संपूर्ण प्रकारावर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे. 

...या अँगलनेही तपास होणे आवश्यक -
यासंदर्भात बोलताना, "शाळा आणि महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला थांबवण्याचे, अशांत करण्याचे काम चालवले आहे. या सर्व बाबींसंदर्भात माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत, निर्देश आहेत, निरीक्षणं आहेत. हे असताना, पुन्हा एकदा जरांगे हम करे सो कायदाप्रमाणे अंतरवाली येथून नुघून, अमुकच्या घरी जातो, तमुकाच्या घरी जातो आणि बघा काय होतंय, मी जीव देतो. या  प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित करत आहेत. लोक रस्त्यावर यावीत या भाणगडीत आहेत. या मागे संपूर्ण राजकीय हेतू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचे राजकारण असेल, या अँगलनेही तपास होणे आवश्यक आहे. महाराष्ट्र डिस्टर्ब होऊ नये, हे महत्वाचे आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे," असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. 

जरांगेंनी नौटंकी बंद करावी -
मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळाल्यानंतर तुमची खेळलेली खेळी संपली, हे आजच्या तुमच्या पत्रकार परिषदेतून लक्षात येते. समाजाच्या नावावर लेकरू लेकरू करुन ढेकरु द्यायचं बंद करा, समाजाला माहिती पडलंय, समाजाला 10 टक्के आरक्षण देण्यात आलेय, समाज खूश आहे. तुमच्या आयडिया आणि अॅडव्हाईसची समाजाला गरज नाही, असे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना उद्देशून म्हटले. तसेच, त्यांनी नौटंकी बंद करावी, असेही लाड यांनी म्हटले आहे. 

काय म्हणाले भुजबळ? -
"मराठा समाजाला विधानमंडळात एकमाताने स्वतंत्र्य आरक्षण दिले आहे. सर्व आमदारांनी आणि सर्व पक्षांनी ते एकमताने केले आहे. तसेच सर्व विरोध पक्षांचे नेते, मग ते काँग्रेसचे असतील, पवार साहेब असतील, शिवसेनेचे असतील किंवा महायुतीचे असतील, त्यांनी हेच सांगितले होते, की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्याचे काम करा. त्याप्रमाणे ते झाले. यानंतर जरांगेंनी अशी आदळ आपट करण्याचे काय कारण आहे?" असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी केला.

भुजबळ म्हणाले, "आता त्याचेच लोक त्याच्य विरोधात आरोप करायला लागले आहेत. त्यामुळेच कदाचित त्रस्त होऊन हे अकांडतांडव त्यांनी सुरू केलेले असेल, असे मला वाटते. कारण, आता त्यांचे पितळ उघडे पडत चालले आहे. त्यात त्यांनी केलेल्या गुप्त बैटका, फिरवलेले निर्णय, मराठा समाजाची त्यांनी जी दिशाभूल केली आहे, हे सर्व आता त्यांचेच लोक बोलायला लागले आहेत. यामुळे कदाचित त्यांचे ब्लड प्रेशर वाढले असेल, त्यामुळेच ते आता काही तरी बोलत आहेत."

एवढेच नाही तर, "माझे त्यांना म्हणणे आहे की, तुम्ही आधी तब्बेत सांभाळा. मला मोठं आश्चर्य वाटतं की, उपोषण करत असतानाही त्यांचा आवाज मात्र फार खणखणीत आणि मोठा आहे. हे कसं काय आहे? आणि ते 10 लोकांनाही ऐकत नव्हते, एवढी शक्ती त्यांना उपोषण कर्त्याला कशी काय आली? हेही वैद्यकीय क्षेत्रातलं मोठं आश्चर्य आहे," असा उपरोधिक टोलाही भुजबळ यांनी यावेळी जरांगेंना लगावला.    

Web Title: a whole political motive behind it Jarange went to Sagar bungalow, Gunaratn Sadavarte made a big demand in the name of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.