नवऱ्याची अर्ध्यावरच साथ सुटली, तरीही 'ती' खचली नाही; जगण्यासाठी करतेय संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 04:04 PM2024-10-10T16:04:04+5:302024-10-10T16:05:10+5:30

सुरुवातीला असंख्य अडचणींचा तिला सामना करावा लागला. पण काहीही झालं तरी मागे हटायचं नाही हे तिने ठरवलं होतं. म्हणूनच ती तग धरू शकली. 

A woman in Jalgaon runs a puncture removal shop after the death of her husband | नवऱ्याची अर्ध्यावरच साथ सुटली, तरीही 'ती' खचली नाही; जगण्यासाठी करतेय संघर्ष

नवऱ्याची अर्ध्यावरच साथ सुटली, तरीही 'ती' खचली नाही; जगण्यासाठी करतेय संघर्ष

प्रशांत भदाणे 

जळगाव - नवरात्रीनिमित्त अनेक महिलांच्या संघर्षमय गाथा आपल्याला वाचायला मिळतात. यातीलच एक, जळगाव शहरातील सपना राजपूत या रणरागिणीने एक इतिहासच घडवला आहे. पतीने साथ सोडल्यानंतरही ती खचली नाही. पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या ट्रकचे पंक्चर काढण्याच्या व्यवसायात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तिचा हा आव्हानात्मक प्रवास प्रत्येक स्त्रीला स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देणारा आहे.

ट्रकच्या भल्या मोठ्या टायरचा पंक्चर काढणं हे तसं प्रचंड मेहनतीचं काम आहे. एरवी हा व्यवसाय पुरुषच करतात, पण पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात जळगावातील एका रणरागिणीनं पाऊल ठेवलं. ट्रकचा टायर खोलणे, त्याचा पंक्चर काढणे..फिटिंग करणे अशी सारी मेहनतीची कामे ती दिवसभर एकटीच करते. आपल्या अंगी धाडस आणि मेहनत करायची तयारी असेल तर महिला पण कोणत्याही व्यवसायात स्वतःला सिद्ध करू शकते, हेच तिने दाखवून दिलंय. तिचा हा आव्हानात्मक प्रवास प्रत्येक स्त्रीला स्वप्नं पाहण्याची प्रेरणा देणारा आहे.

सपना राजपूत असं या महिलेचं नाव आहे. जळगाव शहरातील अयोध्या नगरात ती राहते. सात जन्मभर सोबत राहू...असं वचन देणाऱ्या पतीने, आयुष्याच्या लढाईत तिची अर्ध्यातच साथ सोडली. पोटी दोन लेकरं..सासू...यांची जबाबदारी...हे कमी की काय डोक्यावर घराच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला. अशा परिस्थितीत पुढे कसं जायचं? हा प्रश्न तिच्यासमोर होता. म्हणून आयुष्य संपवून टाकावं हा विचार सतत तिच्या मनात येत होता, पण लेकरांचा चेहरा डोळ्यासमोर येत असल्याने तिने मन घट्ट केलं आणि मग तिथंच सुरू झाला तिचा जगण्याचा संघर्ष. जळगाव एमआयडीसी परिसरात तिच्या पतीचं पंक्चर काढण्याचं दुकान होतं. ते दुकान स्वतः चालवण्याचा निर्णय तिने घेतला. सुरुवातीला असंख्य अडचणींचा तिला सामना करावा लागला. पण काहीही झालं तरी मागे हटायचं नाही हे तिने ठरवलं होतं. म्हणूनच ती तग धरू शकली. 

सपनाने जो मार्ग निवडला त्यावर चालणं एवढं सोपं नव्हतं. एक महिला पंक्चर दुकान चालवते म्हणून लोकांनी नावं ठेवली. खिल्ली उडवली...एवढंच काय तर तिच्या चारित्र्यावरही शिंतोडे उडवले गेले तरी ती खचली नाही, चालत राहिली, मेहनतीच्या बळावर ती आज आपल्या दोन्ही लेकरांचं पोट भरत आहे. पती सोडून गेला तरी सासू आणि दोन्ही मुलांचा ती एकटी सांभाळ करते.

Web Title: A woman in Jalgaon runs a puncture removal shop after the death of her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.