आता पोस्टातही मिळणार आधार कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:28 AM2017-12-01T05:28:56+5:302017-12-01T05:29:11+5:30
युआयडीएआयशी झालेल्या करारानुसार टपाल विभागाने महाराष्ट्र सर्कलच्या निवडक कार्यालयांमध्ये आधार नोंदणीची सोय करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे नवीन आधार कार्ड मिळण्यास मदत मिळेल.
मुंबई : युआयडीएआयशी झालेल्या करारानुसार टपाल विभागाने महाराष्ट्र सर्कलच्या निवडक कार्यालयांमध्ये आधार नोंदणीची सोय करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे नवीन आधार कार्ड मिळण्यास मदत मिळेल. त्यामुळे आता आधार कार्ड काढणे सहज झाले असून वणवण न फिरता थेट फोर्ट येथील जनरल पोस्ट आॅफिसमध्येही ही सेवा उपलब्ध झाली आहे. आधार कार्डमधील सुधारणा व दुरुस्ती करण्याची सेवाही याठिकाणी उपलब्ध आहे. गुरुवारी जीपीओमध्ये या नव्या केंद्राचा आरंभ करण्यात आला.
सध्या एकूण १०७ आधार सुधारीत केंद्र महाराष्ट्रात कार्यरत आहेत. लवकरच आणखी १२९३ केंद्रांमध्ये याविषयी कामकाज सुरू करणार आहेत. देशभरात ११३ कोटींपेक्षा अधिक लोकांकडे आधार कार्ड्स आहेत. केंद्र सरकारने विविध अधिसूचना जारी केल्या आहेत, ज्यामध्ये विविध सेवा आणि बँक खाते, पॅन कार्ड, इन्कम टॅक्स रिटर्न, पासपोर्ट, राशन कार्ड इत्यादीसारख्या सेवा-सुविधांकरिता लाभ घेण्यासाठी आधारची आवश्यकता आहे. राज्य शासनाने विविध अधिसूचनाही जारी केल्या आहेत.