Aaditya Thackeray : ममता बॅनर्जींची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "कोणतीही राजकीय चर्चा नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 09:02 PM2021-11-30T21:02:16+5:302021-11-30T21:03:15+5:30
Aaditya Thackeray met West Bengal CM Mamata Banerjee : राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली.
मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) आजपासून तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे (SiddhiVinayak Temple) दर्शन घेतले. यानंतर राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. या अगोदर दोन-तीन वर्षांपूर्वी देखील जेव्हा त्या आल्या होत्या, तेव्हा स्वतः उद्धव ठाकरे व मी त्यांना भेटण्यासाठी आलो होतो. आता मी संजय राऊत यांच्यासोबत आलेलो आहे. अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री ममतादीदी यांच्यात एक वेगळे नाते आहे. नेहमीच दोघांमध्ये समन्वय राहिलेला आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे.
याचबरोबर, स्वाभाविक होतं की त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. तर मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवले. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Maharashtra Minister and Shiv Sena leader Aaditya Thackeray and party leader Sanjay Raut met West Bengal CM and TMC chief Mamata Banerjee today in Mumbai. pic.twitter.com/yGcZ1sT9Ck
— ANI (@ANI) November 30, 2021
उद्या शरद पवारांसोबत होणार बैठक
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील मी भेट घेणार आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "मला जो संदश द्यायचा आहे, तो मी देईन. मुंबईला येऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या घरी गेले नाही असं शक्य नाही. त्यामुळे मी शरद पवार यांच्या घरी उद्या जाणार आहे".