‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून आदित्य ठाकरेंचे बॅनर; “शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का”, भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 04:58 PM2023-05-23T16:58:46+5:302023-05-23T17:00:22+5:30
Maharashtra Politics: ‘भावी मुख्यमंत्री’च्या यादीत आता आदित्य ठाकरेंची भर पडली असून, यावरून भाजपने खोचक शब्दांत टीका केली.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख असलेले बॅनर लागताना पाहायला मिळत आहे. यात आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची भर पडली आहे. राज्यातील काही ठिकाणी आदित्य ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आले आहेत. यावरून आता भाजपने खोचक टीका केली आहे.
काही महिन्यांपासून राज्यात अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांचेही बॅनर लागले होते. यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असलेले बॅनर लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रपदाच्या शर्यतील आणखी एका नेत्याची भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर खोचक शब्दांत टीका केली.
शिल्लक सेनेत सरपंच तरी होतील का?
त्र्यंबकेश्वर येथे मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या लागलेल्या बॅनरवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. शिल्लक सेनेत आदित्य ठाकरे सरपंच तरी होईल का?, हा विचार करून बॅनर लावावेत, असा टोला नितेश राणे यांनी लगावला. तसेच संजय राऊत टेबल पत्रकार आहेत. त्यांना किती माहिती आहे, याची मला शंका आहे. नवीन संसद इमारतीला तेव्हाच सगळ्यांनी मान्यता दिली आहे. देशासाठी नवीन इमारत बांधली आहे. अडीच वर्षाच्या काळात बाळासाहेबांचे स्मारक तरी बांधू शकले का, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली.
दरम्यान, समर्थकांना बॅनर लावण्याचा अधिकार आहे. अजित पवार यांच्या समर्थकांनी मध्ये बॅनर लावले होते. काही लोकांना आपला नेता मोठा व्हावा ही भावना असते. त्यामुळे बॅनरबाजी करण्यात येते. पण, महाविकास आघाडीत ज्यांचे जास्त आमदार असतील, त्यांचाच मुख्यमंत्री असणार, हेच सूत्र आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.