“उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत”; आदित्य ठाकरे भावनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:35 PM2023-07-22T17:35:53+5:302023-07-22T17:36:10+5:30
Aaditya Thackeray: फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे सांगताना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
Aaditya Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनिषा कायंदे, शिशिर शिंदे यांच्यानंतर नीलम गोऱ्हेंनी ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी विदर्भाचा दौराही केला. शिवसेना फुटल्यापासून आदित्य ठाकरे सातत्याने राज्यभर फिरून दौरे करत आहेत. यातच नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सध्याला देशाची आणि महाराष्ट्राची राजकीय स्थिती अवघड झाली आहे. आपण लढत आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात पुढे जात होता, आज कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा प्रश्न जनतेला पडला आहे. वेदांता फॉक्सकॉन गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. रोजगार गेला आहे. अनेक प्रकल्प महाराष्ट्रमधून गेले. सर्व उद्योग राज्याबाहेर जात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर गुजरातला उद्योग गेले नसते, ते महाराष्ट्रामध्येच राहिले असते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव साहेब अन् मला राजकारण कळत नाही, आम्ही भोळे आहोत
आम्ही भोळे आहोत, उद्धव साहेब आणि आम्हाला राजकारण कळत नाही. हा आमचा गुण आहे की अवगुण? हेच कळत नाही. फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे भावनिक होत, एकीकडे राज्यात फोडाफोडीचं राजकरण सुरु असून कोण आमदार, खासदार कुठून येतो काही कळत नाही. राज्यातील खोके सरकार हे घोषणांचे सरकार आहे. घोषणा केल्या की घटनाबाह्य मुख्यमंत्री आले असे वाटते. राजकारणाची दलदल झाली आहे. कोण कोणाचे फोटो लावतो ते समजत नाही, अशी सडकून टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, या देशाच्या आवाज बुलंद करायचा असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल. आपल्याला प्रत्येक कोनाकोपऱ्यात फिरावे लागेल. देशात हुकूमशाहीचा राजकारण सुरु आहे. बोलले तरी गुन्हे दाखल होत आहेत, या शब्दांत आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला.