CoronaVirus News : राज्यातील कोरोना लसीच्या वितरणाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 07:56 PM2020-11-24T19:56:22+5:302020-11-24T20:20:50+5:30
CoronaVirus News : महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी, कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाबाबत टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून कोरोनावरील लस निर्मिती करणाऱ्या विविध कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तसेच महाराष्ट्रात लसीकरण कशा पद्धतीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून दिली आहे.
दरम्यान, कोरोनाचा संभाव्य उद्रेक लक्षात घेता राज्य सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्याहून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी (RTPCR टेस्ट रिपोर्ट) अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य असेल. अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच प्रवेश मिळेल, तर पॉझिटिव्ह असलेल्यांना कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. रिपोर्ट नसलेल्यांची टेस्ट केली जाईल. रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतूक अशा तिन्ही मार्गावरील प्रवाशांना हे निर्बंध लागू असणार आहे.
कोरोना लसीकरण प्रक्रियेत पारदर्शकता असेल - मोदी
कोरोना लस सर्वात आधी कोणाला मिळणार, यावरही मोदींनी भाष्य केले. आघाडीवर राहून कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिकता द्यायला हवी. कोरोना लसीकरण प्रक्रिया पूर्ण पारदर्शकता असेल, अशी ग्वाही मोदींनी दिली. कोरोना लस एकदा द्यावी लागेल की दोनदा, त्या लसीची किंमत किती असेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही, असे मोदी म्हणाले.
याचबरोबर, कोरोना लसीच्या वितरणासाठी राज्यांसोबत मिळून काम सुरू आहे. लवकरच यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात येईल. कोरोना लसीकरणाची प्रक्रिया बराच काळ चालेल. त्यासाठी आपल्याला एक टीम म्हणून काम करावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूदर घटला आहे. त्यामुळे अनेक जण पुरेशी काळजी घेत नाहीत. कोरोनातून बरं होता येते, असा विचार करून खूप जण बेजबाबदारपणे वागत आहेत. अशी वर्तणूक आपल्याला परवडणारी नाही, असा धोक्याचा इशारा मोदींनी दिला.