Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 11:10 AM2022-07-23T11:10:21+5:302022-07-23T11:11:14+5:30
Maharashtra Political Crisis: अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला पडलेले भगदाड सावरण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत. संपूर्ण राज्यातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. निष्ठा यात्रेनंतर आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्य पालथे घालून पक्ष मजबूत करण्याची मोर्चेबांधणी करत आहेत.
गेली अडीच वर्षे मी एक आमदार, मंत्री आणि मुलगा म्हणून घरात असताना उद्धव ठाकरे साहेबांना काम करताना पाहिले आहे. ते दिवसातील २४ तास जनतेसाठी काम करायचे. अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे. यावरुन काहीवेळा आईकडे जाऊन भांडायचोही. मला हे त्यांना अनेक गोष्टी सांगायच्या होत्या, पण उद्धव ठाकरे सतत मिटिंगमध्ये, कामात व्यग्र असायचे. मी जेव्हा त्यांच्याशी बोलायचा जायचो तेव्हा ते म्हणायाचे की, 'कामाचं बोल, राज्याबद्दल बोल', अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.
आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल
आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांना ठाण्यात प्रचंड प्रतिसाद मिलाला. भिवंडी, कर्जतमध्येही त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. जिकडे जातात तिकडे त्यांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेच्या सोबतच राहू, असे आश्वासन शिवसैनिक देत आहेत. घोषणा देत आहेत. भविष्यातही महाराष्ट्राचे वातावरण असेच शिवसेनामय झाल्याचे दिसेल, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.
आदित्य ठाकरेंची सकाळी सभा, सायंकाळी शिवसैनिक शिंदे गटात
आदित्य ठाकरे यांनी राज्यव्यापी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आदित्य ठाकरे भिवंडीत पोहोचले. आदित्य ठाकरे यांनी भिवंडीत आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये चैतन्य संचारेल, नवी उमेद जागेल, अशी चर्चा होती. मात्र, या भाषणाला काही तास उलटत नाही तोच भिवंडीतील शिवसैनिक एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत आणखीनच भर पडल्याचे सांगितले जात आहे.