Aaditya Thackeray : "दडपशाहीने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार"; आदित्य ठाकरेंचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 01:24 PM2023-05-30T13:24:35+5:302023-05-30T13:31:29+5:30
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
जंतर-मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंन पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरापासून ते आंदोलक खासदार बृजभूषणसिंह यांच्या अटकेसाठी आंदोलन करत आहेत. आता, त्यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचीही नावं आहेत. याच दरम्यान आता आदित्य ठाकरेंनी आपला संताप व्यक्त केला आहे.
"दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते निंदनीय" असंही म्हटलं आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते निंदनीय आहे. शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो!"
खेळाच्या माध्यमातून जगभरात भारताची मान गौरवाने उंचावणाऱ्या खेळाडूंसोबत काल दिल्लीत जे घडलं ते नींदनीय आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 30, 2023
शांततामय मार्गाने विरोध करण्याचा हक्कही न जुमानणाऱ्या आणि दडपशाही मार्गाने लोकांचा आवाज दाबणाऱ्या हुकूमशाही राजवटीचा धिक्कार असो!
देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या… pic.twitter.com/VJaJiVcwSk
"देशातील प्रत्येक सुजाण नागरिकाने अपल्या तरूण खेळाडूंच्या पाठी ठाम उभं रहायला हवं आणि न्यायाची मागणी करायला हवी" असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. नवनिर्वाचित संसद भवनासमोर 'महिला महापंचायत' करण्याता इरादा असलेल्या पैलवांनाना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त असताना देखील आंदोलकांनी बॅरिकेट्स काढून संसद भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, आंदोलनस्थळी एकच राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या कारवाईदरम्यानचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि इतर कुस्तीपटूंची पोलीस धरपकड करत असल्याचे दिसून आले.
राजधानी दिल्लीतील या घटनेवरुन अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. देशासाठी मेडल जिंकणाऱ्या या कुस्तीपटूंचं कधीकाळी सर्वांनीच कौतुक केलं होतं, त्यांचा अभिमान बाळगला होता. आता, या कुस्तीपटूंचा हा अवमान आणि त्यांच्यावर होत असलेली ही कारवाई अवमानजनक असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सेलिब्रिटींनीही यावर मत व्यक्त केलंय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केलाय. तर, स्वरा भास्कराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.