जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:03 PM2024-04-02T12:03:30+5:302024-04-02T12:03:44+5:30
Aaditya Thackeray News: देशात लोकशाही संपत चालली आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. उद्धव ठाकरेंसोबत सगळे एकत्र असून, गद्दारांना लोकांनी नाकारले आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray News: आम्ही थेट जनतेच्या संपर्कात आहोत. जनता आमच्यासोबत आहे. या देशात लोकशाही संपत चालली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा परिस्थितीत आम्ही एकत्र येऊन जे लोक संविधान संपवू पाहत आहेत, त्यांच्या विरोधात लढत आहोत. देशाची लोकशाही आणि संविधान वाचवायचे आहे, ते आमच्यासोबत राहतील, या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर निशाणा साधला.
लोकसभा निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाकडून स्टार प्रचारक आहेत. आदित्य ठाकरेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सभा, बैठका यांवर भर दिला जात आहे. यातच प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी भाजपा तसेच महायुतीवर जोरदार टीका केली. यवतमाळमध्ये फॉर्म भरला जात आहे, तिथे जात आहे. या ठिकाणी सभा आहे, प्रचार सुरू होत आहे. एनडीएकडून अद्याप उमेदवार देण्यात आलेला नाही. एनडीए कोणता भ्रष्ट उमेदवार देणार हे पाहावे लागेल, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात
जगातील अनेक देशांमध्ये एप्रिल फूल डे साजरा केला जातो. मात्र, हा दिवस आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा होतो, असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. तसेच आता देशाचे भविष्य दिसत आहे. परिवर्तनाचे वारे सर्वत्र वाहू लागले आहेत. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रात दिसेल की, इंडिया आघाडीची बांधणी मजबूत आहे. काही महिने, काही दिवसापूर्वी जे यांच्या विरोधात बोलत होते, त्यांनी गद्दारी केली. आता कोण लोक कोणत्या पक्षात आहे. सगळ्यांना माहिती आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
जिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारले आहे
बंडखोरी आणि गद्दारांमध्ये खूप फरक असतो. आता चित्र स्पष्ट झाले आहे. जिथे गद्दारी झाली, तिथे त्यांना लोकांनी नाकारले आहे. गेल्या १० वर्षात भाजपाने केंद्रात आणि राज्यात जी कामे करायला पाहिजे होती, ती केली नाही. सरकारने जी आश्वासन दिली होती, ती अपूर्ण आहेत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. उद्धव ठाकरे सगळ्यांना सोबत घेऊन जात आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सगळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र आहेत, असे आदित्य ठाकरेंनी नमूद केले.
दरम्यान, शिवसेना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीविरोधात लढत होते. आता काय झाले. काही महिन्यांपूर्वी काही लोक काय काय बोलत होते. आता मात्र जनतेसमोर चित्र स्पष्ट आहे, असे सांगत आदित्य ठाकरेंनी महायुतीतील शिंदे गटावर टीका केली.