Aaditya Thackeray : "हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 04:59 PM2024-01-24T16:59:58+5:302024-01-24T17:05:49+5:30
Aaditya Thackeray And NCP Rohit Pawar : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होत आहे. बारामती ॲग्रोमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकारणाबाबत त्यांना ईडी चौकशीला मुंबई कार्यालयात बोलवण्यात आले आहे. ही कारवाई राजकीय सूडापोटी होत असल्याचे आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून केले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. याच दरम्यान आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते" असं म्हणत निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवार यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा पुन्हा एकदा गैरवापर! ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी आहे! अंतिम विजय सत्याचाच असणार" असं आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या @RRPSpeaks ह्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा पुन्हा एकदा गैरवापर! ही लढाई आता सत्यमेव जयते विरुद्ध सत्तामेव जयते अशी आहे! अंतिम विजय सत्याचाच असणार!
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 24, 2024
रोहित पवार यांनी ईडी कार्यालयात जाण्याआधी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन केले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. "मी सध्या एवढंच बोलेन की अधिकारी त्यांचे काम करत असतात. अधिकाऱ्यांनी आतापर्यंत माझ्याकडून जी जी माहिती मागितली आहे ती मी त्यांना दिली आहे. आज मला इथे चौकशीसाठी बोलावले आहे तर मी तिथे जाऊन त्यांना पुन्हा एकदा ती कागदपत्रे देईन. त्यांच्याशी चर्चा करेन."
"अधिकारी त्यांचे काम करत आहेत, पण यामागे विचार काय, शक्ती कोणती, याबाबत मी भाष्य करणार नाही. लोकांशी संवाद साधल्यानंतर मला असे दिसले की मी काढलेली युवासंघर्ष यात्रा आणि सरकारविरोधात उठवलेला आवाज यामुळे ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे. पण मी अजूनही हेच म्हणेन की अधिकारी त्यांचं काम करत आहेत" असं रोहित पवार चौकशीला जाण्याआधी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.