आकांक्षा, ऋचाची घोडदौड
By admin | Published: May 4, 2017 11:46 PM2017-05-04T23:46:29+5:302017-05-04T23:46:29+5:30
सांगली बुद्धिबळ महोत्सव : साक्षीचा विजय, तर गायत्रीची बरोबरी
सांगली : सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर स्मृती आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन खुल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीअखेर पुण्याची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे व कोल्हापूरची फिडे मास्टर ऋचा पुजारी यांनी पाच गुणांसह घोडदौड कायम ठेवली.
कोल्हापूरची ऋचा पुजारी व मुंबईची वृषाली देवधर यांच्यातील डावाची सुरुवात घोड्याच्या चालीने झाली. ऋचाला कोंडीत पकडण्यासाठी वृषालीने राजाकडील बाजू भक्कम करत चाली रचल्या. डावाच्या अखेरीस अनुभवी ऋचाने उंट व हत्तीच्या मदतीने वृषालीला चक्रव्यूहात अडकवत ३९ व्या चालीला पराभूत केले. पुण्याची आकांक्षा हगवणे व मुंबईची विश्वा शहा यांच्यातील डावाची सुरुवात राजाच्या प्याद्याने झाली. आकांक्षाने रचलेल्या चालीला विश्वाने जशास तसे प्रत्युत्तर दिले. डावाच्या अखेरीस विश्वाच्या राजाला आकांक्षाने कोंडीत पकडून ६१ व्या चालीला पराभूत केले.
आंध्र प्रदेशच्या एनएनव्ही अनुषाने गोव्याच्या शालिनी पैसला राणीच्या साहाय्याने धडाकेबाज उत्तर देत ३५ व्या चालीला डाव सोडायला लावला. औरंगाबादच्या साक्षी चितलांगेने गोव्याच्या नंदिनी सारीपल्लीचा ४४ व्या चालीस पराभव केला. सांगलीची गायत्री रजपूत व मुंबईची अवरील डेव्हीड यांच्यातील डाव अर्ध्या गुणासह बरोबरीत सुटला. कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने मुंबईच्या ग्रीष्मा अशरचा ४१ व्या चालीला पराभव केला, तर रत्नागिरीच्या नेहा मुळेला सांगलीच्या पौर्णिमा उपळावीकरने ३६ व्या चालीला नमवले.
नूतन बुद्धिबळ मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. येथील डॉ. बापट बाल विद्यामंदिरमध्ये स्पर्धा सुरू आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
सांगली बुद्धिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरची फिडे मास्टर ऋचा पुजारी व मुंबईची वृषाली देवधर यांच्यात रंगलेला डाव.