आम आदमी पार्टी दिल्लीत, सर्वाधिक देणग्या मात्र महाराष्ट्रातून
By admin | Published: February 9, 2016 01:42 PM2016-02-09T13:42:22+5:302016-02-09T13:42:22+5:30
आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात यश मिळालेलं नसून दिल्लीत मिळालेलं आहे, परंतु या पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा विचार करता दिल्लीपेक्षा महाराष्ट्र पुढे असल्याचे समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात यश मिळालेलं नसून दिल्लीत मिळालेलं आहे, परंतु या पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा विचार करता दिल्लीपेक्षा महाराष्ट्र पुढे असल्याचे समोर आले आहे.
एका अशासकीय संस्थेने केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की, ३०१३ - १४ व २०१४ - १५ या आर्थिक वर्षांमध्ये पार्टीला मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी २३.३८ टक्के देणग्या महाराष्ट्रातून मिळाल्या, तर २०.४८ टक्के देणग्या दिल्लीतून मिळाल्या.
या कालावधीत आपला ४४.७१ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत, यामध्ये ७८.५ टक्के किंवा ३५.१२ कोटी रुपये इतका लोकसहभाग आहे. विशेष म्हणजे सगळया राष्ट्रीय पक्षांचा विचार केला तर लोकसहभागातून मिळालेल्या देणग्यांचे त्यांचे प्रमाण अवघे ७.५ टक्के एवढे आहे. त्यामुळे किमान देणग्यांच्या बाबतीत तरी पक्षाचे नाव आम आदमी पार्टी हे सार्थ असल्याचे दिसत आहे.
पहिल्यांदा आपला डिसेंबर २०१३मध्ये दिल्लीत सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. परंतु ४९ दिवसांमध्येच केजरीवालांनी राजीनामा दिला. नंतरच्या लोकसभा निवडणुकीत आपला पंजाबमध्ये चार जागा मिळाल्या, परंतु महाराष्ट्र व दिल्लीमध्ये एकही जागा मिळाली नाही.
त्यानंतर दिल्लीत पुन्हा झालेल्या निवडणुकांमध्ये आपने ७० पैकी ६७ जागा जिंकत विक्रम केला आणि केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री झाले.
आपने २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या देणग्यांचाही तपशील निवडणूक आयोगाला दिला असून इतका चोख हिशेबीपणा अन्य कुठल्याही पक्षाने दाखवलेला नाही. आपने ५०० रुपये देणगी दिलेल्या ११८ दात्यांचीही नावे दिली आहेत.
२०१४ - १५ या आर्थिक वर्षात, आपला ३,३२६ दात्यांनी १ रुपया ते २० हजार रुपये या दरम्यान २.६८ कोटी रुपये देणगीस्वरुपात दिले आहेत.