मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 01:25 PM2024-10-17T13:25:57+5:302024-10-17T13:27:12+5:30

आम आदमी पार्टीने २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले

Aam Aadmi Party will not contest elections in Maharashtra; Will give strength to 'India' or Mahavikas Aghadi alliance? | मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार उतरणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.

सूत्रांनुसार, आम आदमी पक्षाचं लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही ज्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते असं आप नेत्यांना वाटते. ११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते. संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सध्या आप पक्षानं दिल्ली विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. 

महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणं व्यर्थ असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. आपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीला संघटना विस्तारासाठी निवडणूक लढवायची आहे परंतु वरिष्ठ नेतृत्व त्यात फारसं उत्सुक नाही. इंडिया आघाडीची ताकद वाढवावी असं वरिष्ठांचे मत आहे. मतदारांच्या मनात संभ्रम नको म्हणून महाराष्ट्राच्या निवडणूक मैदानातून आप माघार घेत असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, आम आदमी पार्टीने २०१९ ची महाराष्ट्र आणि झारखंड दोन्ही विधानसभा निवडणूक लढवल्या होत्या. त्यावेळी महाराष्ट्रात २८८ पैकी २४ विधानसभा मतदारसंघात आपने उमेदवार उभे केले. त्यातील २३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. झारखंडमध्ये पक्षाने ८१ पैकी २६ जागांवर निवडणूक लढवली त्यातील सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होतील.

Read in English

Web Title: Aam Aadmi Party will not contest elections in Maharashtra; Will give strength to 'India' or Mahavikas Aghadi alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.