नागझरी पठारावर आमिर खानचे श्रमदान

By admin | Published: April 11, 2017 12:19 AM2017-04-11T00:19:21+5:302017-04-11T00:19:21+5:30

किरण राव यांचाही सहभाग; गावची एकी पाहून भारावलो

Aamir Khan's Shramdan on Nagzari plateau | नागझरी पठारावर आमिर खानचे श्रमदान

नागझरी पठारावर आमिर खानचे श्रमदान

Next

रहिमतपूर : अभिनेते आमिर खानसह पाणी फाउंडेशनची टीम सोमवारी सकाळी आकस्मिकपणे कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे आली. पठार नावाच्या शिवारात मातीनाल बंधारा कामाच्या ठिकाणी जाऊन आमिर खानसह पथकाने एक तास श्रमदान केले. टिकाव, खोरे, घमेले घेऊन माती खोदण्यापासून मातीचा भराव घालण्याचे काम यावेळी करण्यात आले.
पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या मातीनाल बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी आमिर खान आले होते. यावेळी पत्नी किरण राव, पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानुगडे उपस्थित होते.
ग्रामस्थांशी संवाद साधताना आमिर खान म्हणाले, ‘वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी साठविण्याच्या कामासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. नागझरी ग्रामस्थांची श्रमदानासाठी झालेली एकी पाहून मन भारावून गेले आहे. बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी साठवणुकीसाठी सुरू झालेल्या या मोहिमेसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’
‘पाणी साठविणे काळाची गरज आहे. बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी साठविल्याने जमिनीतील पाणी पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याचा तुटवडा न भासता उन्हाळ्यामध्येही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. विकास सोसायटीची निवडणूक एका विचाराने पार पडल्याने गावात एकोप्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे,’ असेही आमिर खान म्हणाले.
यावेळी सरपंच कल्पना भोसले, उपसरपंच मनीषा मुळीक, जितेंद्र भोसले, विलास भोसले उपस्थित होते.


फोटो सेशनसाठी गर्दी
अभिनेते आमिर खान आले असल्याचे समजल्यानंतर परिसरातील गावांमधून युवक व ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. शेवटी आमिर खान व किरण राव यांनी एकत्र फोटो देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली.

Web Title: Aamir Khan's Shramdan on Nagzari plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.