मुंबई पोलिसांना ‘आॅन ड्युटी’ आता केवळ ८ तास
By admin | Published: January 2, 2017 06:11 AM2017-01-02T06:11:02+5:302017-01-02T06:11:02+5:30
दीड कोटी मुंबईकरांचा ‘थर्टी फर्स्ट’ कोणतेही गालबोट न लागता जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी शनिवारी रात्रभर दक्ष असणाऱ्या मुंबईतील ४५ हजारांपेक्षा पोलिसांना नव्या वर्षात अनोखे ‘गिफ्ट’ मिळाले आहे.
मुंबई : दीड कोटी मुंबईकरांचा ‘थर्टी फर्स्ट’ कोणतेही गालबोट न लागता जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी शनिवारी रात्रभर दक्ष असणाऱ्या मुंबईतील ४५ हजारांपेक्षा पोलिसांना नव्या वर्षात अनोखे ‘गिफ्ट’ मिळाले आहे. शहर व उपनगरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी ८ तासांची करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी १ जानेवारीपासून सर्व
९२ पोलीस ठाण्यांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणी व विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आता प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी होते की हा निर्णय केवळ कागदावरच राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या वेळापत्रकानुसार, तीन सत्रांमध्ये पोलिसांच्या ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यांपासून त्याची प्रायोगिक तत्त्वावर काही पोलीस ठाण्यांत कार्यवाही केली जात होती. आता सर्वच पोलीस ठाण्यांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे दररोज सरासरी १० ते १४ तास राबणाऱ्या पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अन्य सरकारी खात्यांप्रमाणे पोलिसांनाही ८ तास ड्युटी देण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत होती. पोलीस पत्नी संघटनेनेही त्यासाठी आंदोलन पुकारले होते. मात्र मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव वरिष्ठ अधिकारी याबाबत निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नव्हते.
नियोजन यशस्वी
टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढवली असून, सध्या शहर व उपनगरातील ७० टक्क्यांवर पोलीस ठाण्यांत ८ तासाच्या ड्युटीचे यशस्वीपणे नियोजन करण्यात आले आहे. मात्र उपलब्ध मनुष्यबळात सर्वच पोलीस ठाण्यांत हा निर्णय लागू करायचा असल्याने त्यासाठी काही अतिरिक्त पथक, विभाग तसेच मालमत्ता कक्ष, वाहनचोरीविरोधी कक्ष, सोनसाखळी चोरीविरोधी कक्ष, सीआययू विभागाचे लॉजिस्टिक युनिट तसेच सशस्त्र दल ताडदेव (एलए - २) बंद केले जाणार आहे.