आबांचे पुण्याशी ऋणानुबंध

By admin | Published: February 17, 2015 01:22 AM2015-02-17T01:22:14+5:302015-02-17T01:22:14+5:30

राष्ट्रवादीतील प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील विविध कार्यक्रमांना आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले जायचे. त्यांच्या भाषणाला पुण्यातील तरुणांची हमखास गर्दी व्हायची.

Aans Pune Relations | आबांचे पुण्याशी ऋणानुबंध

आबांचे पुण्याशी ऋणानुबंध

Next

पुणे : राष्ट्रवादीतील प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील विविध कार्यक्रमांना आर. आर. पाटील यांना निमंत्रित केले जायचे. त्यांच्या भाषणाला पुण्यातील तरुणांची हमखास गर्दी व्हायची. सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना ते प्राधान्याने उपस्थित राहत असत. मात्र, त्या वेळी हॉटेलमध्ये जेवण्याऐवजी कार्यकर्त्याच्या घरी जेवणाचा त्यांचा आग्रह असायचा, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

आर. आर. पाटील हे ग्रामीण भागातून आलेले अभ्यासू व समाजमान्य नेते होते. विधिमंडळातील त्यांच्या कामकाजाबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान मिळाला होता. लोकलेखा समितीमध्ये असतानाही त्यांनी चागंले काम केले होते. विधिमंडळातील प्रत्येक प्रश्नाला ते हजरजबाबीपणे मार्मिक उत्तर देत असत. ग्रामीण भागातील जेवणांची त्यांना आवड होती. सरकारी यंत्रणेच्या सुधारणेविषयी आम्ही अनेकदा चर्चा करायचो. आमचे चांगले मित्र गेल्याचे दु:ख वाटते.
- गिरीश बापट, पालकमंत्री.

माझ्या रेखाचित्राचे केले होते कौतुक
मी पंढरपूरला उपअधीक्षक असताना आर. आर. पाटील यांच्या कुटुंबीयांशी जवळचा संबंध आला. त्यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी आहे. ते वारीला आले की त्यांच्यासोबत वेळ जात होता. मे २०१४ मध्ये मी त्यांचे रेखाचित्र रेखाटले होते. हे रेखाचित्र एका ओळखीच्या व्यक्तीकडून त्यांना मुंबईला पाठवले होते. पोलीस दलामध्ये असेही कलाकार आहेत याचं त्यांना कौतुक वाटलं होतं. त्यांनी फोन करून माझं कौतुक करून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांच्याशी कामानिमित्त संपर्क येत होताच. परंतु चांगलं काम केलं की ते नेहमी शाबासकीची थाप देत असत.
- पी. आर. पाटील,
अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची मुदत पाच वर्षांवरून एक वर्षावर आणण्यात आल्यानंतर मी तत्कालीन ग्रामविकासमंत्री असलेल्या आर. आर. पाटील यांना भेटून इतक्या कमी काळात अध्यक्षपदावरील व्यक्तीस काहीही काम करता येणार नाही, असे सांगून अध्यक्षपदाची मुदत वाढविण्याची विनंती केली होती. आर. आर. पाटील यांनी पाठपुरावा करून अध्यक्षपदाची मुदत अडीच वर्षांवर आणली. त्यांनी ग्रामविकासमंत्री असताना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्यामुळे राज्यातील गावे स्वच्छ होऊ लागली. गृहमंत्री असताना तंटामुक्त गाव योजना सुरू केली. तिलाही मोठे यश मिळाले.
- जालिंदर कामठे, अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

आबा हे आमच्या पक्षाचेच नव्हे; तर संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व होते. पक्षापलीकडे जाऊन वैयक्तिक जीवनातही आमची घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी कधीच आपल्या विचारांशी तडजोड केली नाही. म्हणूनच महत्त्वाच्या पदांची जबाबदारी ते समर्थपणे व लीलया पेलू शकले. अनेक कसोटीच्या प्रसंगांवर त्यांनी आजवर मोठया धैर्याने तोंड दिले. कर्करोगासारख्या आजाराशी त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. परंतु अशा लढवय्या नेत्यास काळापुढे मात्र हार मानावी लागली. आबांच्या एकाकी जाण्याने दु:खांचा डोंगर आमच्यावर कोसळला आहे. त्यांच्या असंख्य स्मृतींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली....
- दिलीप वळसे-पाटील,
माजी विधानसभा अध्यक्ष

आर. आर. आबा हे विधिमंडळातील आमचे मार्गदर्शक होते. एखादे काम घेऊन गेल्यानंतर ते कधीही नकार द्यायचे नाहीत. उलट
अधिकाऱ्यांकडून कसे काम करून घ्यायचे याचे ते मार्गदर्शन करीत असत. तुझ्याकडे घरी जेवायला येईन. त्यावेळी मला शेतात जेवण दे. निवडणुकीनंतर मी नक्की येईन, असे ते म्हणाले होते. परंतु, त्यांच्या जाण्याने त्यांची माझ्या शेतात येऊन जेवण करण्याची इच्छा अपुरी राहिली.
- बापू पठारे, माजी आमदार.

जपला फौजदाराशी स्नेह
आर. आर. आबांनी पोलिसांसाठी राबवलेली कुटुंब आरोग्य योजना खूपच महत्त्वाची ठरली. आबांचे आणि माझे गाव शेजारी शेजारी आहे. ते आमदार आणि मी फौजदार सोबतच झालो. त्यांच्या वडिलांशी माझ्या वडिलांचा जुना स्नेह होता. तोच स्नेह पुढे आम्हीही जपला. त्यांचे आणि माझ्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. ग्रामीण भागातून तरुणांना एकत्र करून स्वत:चे वेगळे स्थान त्यांनी निर्माण केले होते. एक चांगला माणूस हरवल्याची जाणीव सतत होत राहील.
- अनिल पाटील,
पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, पुणे

महाराष्ट्राच्या राजकारणात ग्रामीण भागाची इंत्यभूत माहिती असणारा नेता म्हणून आर. आर. पाटील यांची ओळख होती. ग्रामविकासाच्या विविध योजना राबवत असताना सारासार विचार करणारे व्यक्तीमत्व म्हणून ते सर्वपरिचीत होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने त्यांना श्रद्धांजली.
- सोनाली मारणे, शहराध्यक्ष
महिला काँग्रेस

४राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अनेक मेळावे पुण्यात होत. त्यावेळी आर. आर. पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक असायचे. निवडणुकीच्या काळातही त्यांचे भाषणे मतदारसंघात घेण्यासाठी उमेदवारांची चढाओढ असायची. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांपासून ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय प्रतिनिधी संमेलनाला ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे मार्गदर्शन न मिळाल्याची हळहळ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविली होती. पक्षातील सहकारी आमदार व पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षातही त्यांचे अनेक मित्र होते. त्याविषयी पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यांच्या आठवणी सांगितल्या.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून गरिबीशी झगडत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारणारे आबा हे एक संवेदनशील आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होतं. मी राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आवर्जून लीलावती रुग्णालयात भेटायला गेलो होतो. मला बघताच त्यांनी माझा हात हातात घेतला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. त्याही परिस्थितीत त्यांनी मला ‘विजयराव तुमचे भवितव्य उज्ज्वल आहे. चांगले काम करा. यशस्वी व्हा,’ अशा शब्दांत प्रोत्साहन दिले.
- विजय शिवतारे, राज्यमंत्री, जलसंपदा

हजरजबाबी,
प्रभावी वक्ता...
शांतिनिकेतन शाळेचा विद्यार्थी असल्यापासून मी आर. आर. पाटीलला ओळखत होतो. राजकीय कार्यक्रम व भाषणांना आवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे विधिमंडळात कितीही आरोप-प्रत्यारोप झाले, तरी ते तोल ढळू न देता प्रखर शब्दांत मार्मिक उत्तर देत असत. हजरजबाबी व प्रभावी वक्ता म्हणून त्यांनी सभागृहात भाषणे केली. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना ते आदर्श मानून राजकारण करीत होते, अशी आठवण माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितली.

विनीताची
विचारपूस करायचे...
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यामध्ये अशोक कामठे शहीद झाले; मात्र ते माझे एक मित्र व आदर्श अधिकारी होते, असे कौतुक करून आर. आर. पाटील पुण्यात एखाद्या कार्यक्रमात भेटले, की माझ्याकडे माझी बहीण व अशोक कामठे यांची पत्नी विनीताची विचारपूस करायचे. मंत्री असूनही त्यांच्यातील साधेपणा दुर्मिळ होता, राष्ट्रवादीतील एक सच्चे व आदर्श नेते आमच्यात नसल्याचे अतीव दु:ख होते, अशी आठवण खासदार व शहराध्यक्ष अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितली.

आर. आर. पाटील यांचे निधन अनपेक्षित व धक्कादायक आहे. राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना ग्रामीण भागातून येवून उपमुख्यमंत्री पदापर्यंतची त्यांची कारकीर्द स्वच्छ होती. ते सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणी होते. महात्मा गांधी तंटा मुक्ती अभियान व संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान यासारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे त्यांनी त्यांच्या कारकिर्र्दीत वेगळा ठसा उमटवला होता.
- अनिल शिरोळे, खासदार.

राज्याचा पुरोगामी चेहरा म्हणून आबांनी महाराष्ट्रात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली होती. त्यांनी आपल्या अमोघ वत्क्तृत्वाने महाराष्ट्राच्या जनतेवर अधिराज्य गाजवले. अत्यंत प्रामाणिक आणि निस्पृह कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- अ‍ॅड. अभय छाजेड, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आबा तळागहापर्यंत पोचले होते. ग्रामस्वच्छतेचा विचार त्यांनी निर्माण केला. तसेच तंटामुक्तीची कल्पनाही त्यांचीच होती. अशा या कल्पक नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
- बाळासाहेब शिवरकर

महाराष्ट्राची मुलूख मैदानी तोफ आज थंडावली. उमद्या कार्यकर्त्यास आपण मुकलो. ग्रामीण भागाशी नाळ असलेला नेता आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- रूपाली चाकणकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस

 

Web Title: Aans Pune Relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.