विधानसभा निवडणुकीत 'आप' अलिप्त
By admin | Published: October 13, 2014 01:29 PM2014-10-13T13:29:33+5:302014-10-13T13:30:21+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठी हवा करणारी आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र, गायब झालेली दिसत आहे.
अहमदनगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठी हवा करणारी आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणुकीत मात्र, गायब झालेली दिसत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढविणार नाही असे आधीच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट केले होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने कोणत्याही पक्षाला अथवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असे प्रसिध्दीपत्रक आप चे जिल्हा संयोजक किरण उपकारे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला जो योग्य वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे, असेही सांगण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने देशासह राज्यात अनेक मतदारसंघात उमेदवार उभे करून मोठी हवा निर्माण केली होती. पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही विविध मोहिमा हाती घेवून चांगली वातावरण निर्मिती केली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र, या पक्षाच्या उमेदवार दीपाली सय्यद यांना स्वत:ची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. राज्यातील बहुतांश मतदारसंघात पक्षाच्या अनेक उमेदवारांची अशीच स्थिती राहिली. त्यामुळे लोकसभेपासून हा पक्ष अडगळीत गेला. विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा आप जोमाने कामाला सुरुवात करेल अशी 'आम आदमी'ची अपेक्षा होती. पक्षाने मात्र, अलिप्त राहण्याचाच निर्णय घेतला. मध्यंतरी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांना आप चा पाठिंबा मिळणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, कुणालाच पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वानेच जाहीर केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांवरही शांत बसण्याची वेळ आली आहे. आता या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सद्सद् विवेकबुध्दी जागृत ठेवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.