आषाढीचा नवा चेहरा

By admin | Published: July 26, 2015 02:56 AM2015-07-26T02:56:30+5:302015-07-26T02:56:30+5:30

सांडपाणी व प्रदूषणामुळे सदैव डोईवर राहणाऱ्या चंद्रभागेच्या पावित्र्याच्या मुद्द्याचे ओझे... लाखोंची गर्दी व त्या गर्दीमुळे नेहमीच उभा राहणारा नैसर्गिक विधीच्या जागेचा प्रश्न,

Aashad's new face | आषाढीचा नवा चेहरा

आषाढीचा नवा चेहरा

Next

- राजा माने
(लेखक लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे संपादक आहेत.)

सांडपाणी व प्रदूषणामुळे सदैव डोईवर राहणाऱ्या चंद्रभागेच्या पावित्र्याच्या मुद्द्याचे ओझे... लाखोंची गर्दी व त्या गर्दीमुळे नेहमीच उभा राहणारा नैसर्गिक विधीच्या जागेचा प्रश्न, पाण्याविना अस्ताव्यस्त बनलेली अस्वच्छ स्वच्छतागृहे व कोणाचा मेळ कोणाला नसल्यागत धावूनधावून दमलेली शासकीय यंत्रणा, ही पार्श्वभूमी घेऊन पांडुरंगाच्या ओढीने आलेल्या लाखो वारकऱ्यांनी व्यापून गेलेले पंढरपूर! आषाढी वारीचे दरवर्षीचे हे चित्र वारकऱ्यांना नवे नाही. तरीही एकमेकांना गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीतही ‘माउली... माउली...’ म्हणत एकमेकाला सावरून घेणे, ही वारकऱ्यांची परंपरा... खरेतर, एकाच गावात १०-१२ लाख लोक एकत्र येतात तरीही सर्वकाही व्यवस्थित पार पडते, ते कशामुळे ? वारकऱ्यांचा माउली दर्शनाचा निस्सीम भक्तिभाव आणि स्वयंशिस्त यामुळेच वर्षानुवर्षे आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पडते आहे. सुविधा, अस्वच्छता आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या समस्यांवर वारीत ठोस उत्तर का सापडू नये?

शासनाचे सर्व विभाग, मंदिर समिती, पंढरपूर नगर परिषद यांच्याकडे खऱ्या अर्थाने वारीचे यजमानपद असते. या यजमानपदाला न्याय देण्याची निश्चित व्यवस्थापन पद्धती मात्र कधी विकसितच झाली नाही. त्याच कारणाने आषाढी वारी आणि वारीतील प्रश्न दरवर्षी तेच असले तरी ते सुटले मात्र नाहीत. असे का घडते, या प्रश्नालाही तसा अर्थ नसायचा. या वर्षी मात्र आषाढी वारीला नवा चेहरा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
२००५ साली आपल्या देशाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनासाठी घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडेन्ट रिस्पॉन्स सिस्टीम) स्वीकारली. या प्रणालीमुळे सेवा, त्या पुरवण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि त्या यंत्रणेसाठी आवश्यक असणारी पायाभूत सुविधा अथवा आर्थिक तरतूद या सर्व मुद्द्यांना कालबद्ध आराखड्यात बांधण्यात आले. मंदिर समितीचे प्रभारी अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, अपर जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा पोलीसप्रमुख वीरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे आणि जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांची एक सुसूत्र टीम तयार करण्यात आली. त्याच टीमने ५ जूनपासून आषाढी वारीसाठी प्रणालीनुसार घेतलेल्या कष्टामुळे या वेळेची आषाढी वारी वेगळ्या अर्थाने वारकऱ्यांना सुखावणारी ठरू शकते. प्रत्येक पालखी मार्ग व पालखी तळावरील सुविधा, त्या पुरविण्यासाठी पूर्णपणे जबाबदार असणारी यंत्रणा, मंदिर परिसरात दरवर्षी अतिक्रमणामुळे वारकऱ्यांची होणारी तारांबळ यांसारख्या मूलभूत अडचणींवर मात करण्याचे काम तुकाराम मुंढे आणि त्यांच्या टीमने केल्याचे दिसते. कोणी कोणाला विचारायचे हा वारीतील नेहमीचा गुंता या वारीत १०० टक्के सुटलेला दिसतो. आरोग्यापासून पोलिसांपर्यंतची संपूर्ण यंत्रणा एका छताखाली आल्यामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही समस्येवर एका ठिकाणी जाब विचारणे वारकऱ्यांना सोयीचे झालेले आहे. दरवर्षी येणाऱ्या अनेक वारकऱ्यांचे निवासस्थान पंढरपुरातील अनेक कुटुंबे, मठ, धर्मशाळा आणि मिळेल ती जागा असे असते. या वेळी मात्र ६५ एकर क्षेत्रात ‘भक्तीसागर’ नावाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र तळ विकसित करण्यात तुकाराम मुंढे यांना यश आले आहे. राहुट्या, पिण्याचे पाणी, रस्ते, लाईट आणि स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. गोपाळपूर रस्त्यावरील दर्शनरांग आणि त्या परिसरातील अस्वच्छता हा वारकऱ्यांना कमालीचा त्रास देणारा विषय असतो. या वर्षी मात्र दर्शनरांगेजवळ असलेल्या कायमस्वरूपी पत्राशेडजवळच पाच प्रशस्त तंबू बांधले आहेत. त्या तंबूत पिण्याचे पाणी आणि चहाचीदेखील मोफत व्यवस्था केलेली आहे. याच परिसरात रांगेत थांबणे सुसह्य व्हावे यासाठी त्याच परिसरात उपाहारगृह उभारण्यात आले आहे. दर्शनरांगेच्या इमारतीत प्रथमच अतिदक्षता विभाग उभा करण्यात आला आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे.

 

Web Title: Aashad's new face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.