‘अब की बार किसान सरकार...’; तेलंगणाचे CM चंद्रशेखर राव यांचा नारा, भारत राष्ट्र समितीची नांदेडमध्ये विशाल सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 06:16 AM2023-02-06T06:16:05+5:302023-02-06T06:17:38+5:30
भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली.
नांदेड : स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. परंतु आजही शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यामुळे देशात शेतकऱ्यांचे सरकार आवश्यक आहे. त्यामुळे हातात गुलाबी झेंडा घ्या अन् शेतकऱ्यांचे सरकार आणा. दोन वर्षांत महाराष्ट्रासह देशात झगमगाट दिसून येईल, असे म्हणत अब की बार किसान सरकार, अशी घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली.
भारत राष्ट्र समितीचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने रविवारी नांदेडातील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर केसीआर यांची सभा झाली. यावेळी केसीआर म्हणाले, ७५ वर्षांत देशात अनेक सरकारे आली. परंतु आजही पिण्यासाठी, सिंचनासाठी पाणी नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात तर दररोज शेतकरी आत्महत्या होतात याचे दु:ख आहे. देशाचे पंतप्रधान संसदेत मोठ-मोठी भाषणे करतात. परंतु दिल्लीत अनेक महिने शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात साडेसातशे जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याबद्दल मोदी एक शब्दही बोलले नाहीत. या सभेत नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, अहमदनगर, गडचिरोलीसह अनेक भागातील माजी आमदार, जिल्हा परिषद, न. प. सदस्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला.
भारतात दरवर्षी साधारणत: १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो. अर्ध्या पाण्याचे बाष्पीभवन होते. जवळपास ७० ते ७५ हजार टीएमसी पाणी नद्यांमध्ये वाहते. त्यातील फक्त २० हजार टीएमसी पाण्याचा आपण उपयोग करतो, असेही केसीआर म्हणाले.
शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखावी
देशात ७५ वर्षांपैकी जवळपास ६० वर्षांहून अधिक काळ काँग्रेस आणि भाजपचे सरकार आहे. परंतु कुणीही आले तरी भाषणबाजी, कोणी किती खाल्ले, अदानी-अंबाणीच्या जवळचा कोण? हीच चर्चा होते. देशातील शेतकऱ्यांनी आपली ताकद ओळखण्याची गरज आहे. त्यासाठी एकत्र या, गुलाबी झेंडा हाती घ्या अन् आपली ताकद दाखवून किसान सरकार आणा, असे आवाहन त्यांनी केले.
सार्वजनिक कंपन्यांचे खासगीकरण हाेऊ देणार नाही
लोकांना भीती घालून खासगीकरणाचा घाट घातला जात आहे; परंतु बीआरएस जनहिताच्या एलआयसी, वीज वितरणसारख्या कंपन्यांचे कधीही खासगीकरण होऊ देणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर पुन्हा यांचे राष्ट्रीयीकरण केले जाईल, असे केसीआर सभेनंतर पत्रपरिषदेत म्हणाले.