आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा

By admin | Published: September 10, 2016 05:09 AM2016-09-10T05:09:18+5:302016-09-10T06:13:14+5:30

वैयक्तिक प्रश्न, नातेसंबंधातील दुरावा, नोकरीतील असुरक्षितता आणि असमाधान अशा अनेक कारणांतून तणाव निर्माण होतो.

Abandon the idea of ​​suicide, there will be a new zeal in mind | आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा

आत्महत्येचा विचार सोडून मनामध्ये नवी उमेद जागवा

Next

पूजा दामले,

मुंबई- नैसर्गिक आपत्ती, समाजाचा दबाव, वैयक्तिक प्रश्न, नातेसंबंधातील दुरावा, नोकरीतील असुरक्षितता आणि असमाधान अशा अनेक कारणांतून तणाव निर्माण होतो. अधिक काळ तणाव राहिल्याने त्यातून नकारात्मक विचार निर्माण होतात. सतत प्रयत्नांतून उत्तर मिळत नसल्यामुळे स्वत:ला संपविण्याचा मार्ग निवडला जातो. आत्महत्येचा संबंध हा मानसिक आरोग्य आणि समाजाशी आहे. ‘सद्य:स्थिती बदलेल’ ‘यातून सुटू’ असा सकारात्मक विचार करणे आवश्यक असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘आत्महत्या प्रतिबंध दिना’च्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने तज्ज्ञांची मते जाणून घेतली.
समस्या येत असतातच पण त्यात अडकून पडणे चुकीचे आहे. समस्यांपुढे आयुष्य आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. समस्येपलीकडे विचार करणे आवश्यक असते. या विचारांमुळे सकारात्मक विचार मनात रुजू लागतात. ‘अंधारात आशेचा किरण नवी उमेद देतो’ हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कितीही संकटे आली तरी खचून जाऊ नये, मानसिक समतोल राखणे महत्त्वाचे आहे. याची सवय माणसाने लावून घेतली पाहिजे, असे मत केईएम रुग्णालयाच्या मानसोपचार विभागप्रमुख डॉ. शुभांगी पारकर यांनी व्यक्त केले.
‘मार्केट जॉय... मॅक्सिमम जॉय’
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी म्हणाले, सद्य:स्थितीचा विचार केल्यास आजूबाजूला नकारात्मक गोष्टी प्रकर्षाने दिसतात, जाणवतात. बातम्यांमध्येही बलात्कार, अपहरण, खून अशाच गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळेही नकारात्मकता वाढत चालली आहे. पण, यावर उपाय म्हणजे सकारात्मकता वाढवणे. यासाठी कोणतेही अधिक कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. दैनंदिन जीवनात छोटाशी सकारात्मक घटना घडली तरी तिला महत्त्व द्या. लहान असली तरी ती सकारात्मक आहे. याला महत्त्व आहे. त्यामुळे ‘मार्केट जॉय... मॅक्सिमम जॉय’ हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे. नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहिजे. शारीरिक दुखणे असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करा.
>तणावाखालील व्यक्तींची काळजी घ्या !
अनेक व्यक्ती तणावाखाली असतात. प्राथमिक पातळीवर तणावाखालील व्यक्ती पटकन लक्षात येत नाहीत. पण, व्यक्तीच्या वागण्यात-बोलण्यात बदल झाल्यास तत्काळ त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा. त्या व्यक्तीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जा.
१)या व्यक्तींना एकटे राहू देऊ नका
२)घरातील तीक्ष्ण वस्तू लपवून ठेवा
३)विषारी पदार्थ घरात ठेवू नका
४)खोलीचा दरवाजा बंद करू देऊ नका
५)त्यांच्याशी बोलताना सकारात्मक गोष्टी बोला
६)वेळच्या वेळी औषधे द्या
हेल्पलाइनमुळे
शेतकऱ्यांना मदत
गेल्या वर्षी राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांसमोर प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्या. पण, अनेक शेतकऱ्यांना समुपदेशन मिळाल्याने त्यांनी पुन्हा नव्याने जीवन सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी मानसिक आरोग्यासाठी ‘१०४’ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर ३१ आॅगस्ट २०१६पर्यंत एकूण २० हजार ७२३ कॉल्स आले आहेत. यापैकी २१४ कॉल्स हे आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा आत्महत्येचा विचार मनात आहेत, यासाठी आले असल्याची माहिती हेल्पलाइनच्या केंद्रप्रमुख नीरजा बैंकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
दृष्टिकोन बदलायला हवा!
आत्महत्या करणे, आत्महत्येचा विचार मनात येणे हा साधा सरळ विषय नाही. पण, गेल्या काही वर्षांपर्यंत आत्महत्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जायचे नाही. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीला घाबरट, पळपुटा असे म्हटले जायचे. आता या विचारात बदल होताना दिसत आहे. आत्महत्येचा संबंध हा मानसिक आरोग्याशी, समाजाशी आहे. मेंदूतील रासायनिक बदलांचा परिणाम आहे. हा मानसिक आजार असल्यामुळे त्यावर औषधोपचार आवश्यक आहेत. त्यामुळे मानसिकता, दृष्टिकोन बदलायला हवा.
जेव्हा एक माणूस आत्महत्येचा प्रयत्न करतो त्याआधी ९ जणांनी हा प्रयत्न केलेला असतो. ‘९ पॅरा सुसाईड’ असे संबोधतात. याला आळा घालण्यासाठी दृष्टिकोनात बदल व्हायला हवा.
- डॉ. राजेंद्र बर्वे, मानसोपचार तज्ज्ञ
>2015 या वर्षात १५३ तर जानेवारी ते आॅगस्ट २०१६ दरम्यान
६१ आत्महत्येसंदर्भात कॉल्स हेल्पलाइनवर आले आहेत. २०१५मध्ये आलेले बहुतांश कॉल्स हे आशा वर्कर्सनी शेतकऱ्यांसाठी केले होते. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत अडकलेल्या शेतकऱ्यांना पुढे जाण्याचा मार्ग सुचत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
104 या क्रमांकावर या शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले. त्यांना पर्यायी मार्ग सुचवले गेले होते. त्याचबरोबर परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे कॉल्स आणि अत्यल्प
प्रमाणात मनाविरुद्ध लग्न झाल्यामधून तणावाखाली असणाऱ्या महिलांचे आले होते. तर, घटस्फोटाच्या प्रक्रियेत असणाऱ्यांचेही कॉल्स येत असल्याची माहिती नीरजा यांनी दिली.

Web Title: Abandon the idea of ​​suicide, there will be a new zeal in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.