महापालिकेत ओबीसीसाठी २९ जुलैला आरक्षण सोडत; वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2022 05:25 AM2022-07-23T05:25:25+5:302022-07-23T05:26:40+5:30
महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना, आधीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इतर मागसवर्गाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण सोडत काढण्यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
निवडणूक होऊ घातलेल्या महापालिकांसाठी येत्या २९ जुलैला तर जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी २८ जुलै, २०२२ रोजी ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्यानुसार, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून ओबीसी, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नव्याने सोडत काढण्यात येईल. मुंबई महापालिकेत २७ टक्के ओबीसी आरक्षणानुसार, ओबीसींसाठी ६३ जागा राखीव असतील.
महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठी सोडत काढताना, आधीचे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण कायम राहणार आहे. ओबीसी आरक्षण सोडतीची प्रक्रिया ५ ऑगस्ट, २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, याशिवाय आयोगाने राज्यातील २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले आहेत.
यासाठी निघणार आरक्षण सोडत
महापलिका : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर.