आबा गेले...
By admin | Published: February 17, 2015 02:52 AM2015-02-17T02:52:24+5:302015-02-17T02:52:24+5:30
तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट अशी छबी उमटविणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील अर्थातच सर्वांचे लाडके ‘आबा’ यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले.
महाराष्ट्र हळहळला : संवेदनशील नेता हरपला
आज दुपारी अंजनी या त्यांच्या गावी अखेरचा निरोप देणार
राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर
मुंबई : साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, गोरगरिबांबद्दल विलक्षण कळवळा आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर अमीट अशी छबी उमटविणारे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील अर्थातच सर्वांचे लाडके ‘आबा’ यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५८ वर्षांचे होते. आबांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. राजकारणातील एक साज्वळ, संयमी चेहरा आणि युवापिढीपुढचा आदर्श नेता हरपल्याची भावना व्यक्त झाली.
त्यांच्या पश्चात आई भागीरथीबाई, पत्नी सुमन आणि स्मिता आणि सुप्रिया या दोन मुली, मुलगा रोहित आणि दोन भाऊ असा परिवार आहे. आबांचे पार्थिव सायंकाळी राष्ट्रवादी कार्यालयात नेण्यात आले. तेथून ते त्यांच्या गावी नेले जाईल. मंगळवारी दुपारी १२ वाजता अंजनी (ता. तासगाव) या त्यांच्या गावी त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल. या वेळी राज्यभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. तोंडात उजव्या बाजूला असलेल्या गाठीकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष त्यांच्या जिवावर बेतले. लोकसभा निवडणुकाच्या आधी त्यांना या गाठीची कल्पना आली होती; मात्र त्यांनी ‘आधी लगीन कोंडाण्याचे’ या वृत्तीने निवडणुकीत स्वत:ला झोकून दिले. विधानसभा निवडणुकीनंतर ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल
झाल्यानंतर कर्करोगाचे निदान झाले. तेथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
नंतर केमो थेरीपीसाठी त्यांना लीलावतीमध्ये नेण्यात आले. मधल्या काळात उपचाराला साथ मिळत असताना मोठ्या प्रमाणावर लोक भेटीला येऊ लागले आणि त्यातून इन्फेक्शन झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर केमो पोर्टद्वारे थेरीपी सुरू होती; पण उपचारांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. संयमी पण तितक्याच धारदार वक्तृत्वशैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या आर. आर. पाटील यांचा जन्म १६ आॅगस्ट १९५७ रोजी सांगली जिल्ह्यातील अंजनीमध्ये झाला.
प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत लहानपणी श्रमदान करून त्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालामध्ये त्यांनी कला शाखेची पदवी घेतली आणि नंतर वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले. १९७९मध्ये सावळजमधून ते काँग्रेसकडून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९८९ ते ९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.
१९९०मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडले गेले. त्यानंतर सातत्याने १९९५, १९९९, २००४, २००९ व २०१४ या सर्व निवडणुकांमध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. ग्रामविकास खात्याची जबाबदारी सांभाळताना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवून आपल्या वेगळ्या कार्यशैलीची चुणूक दाखवली. त्यांचे हे कार्य पाहून शरद पवार यांनी त्यांच्याकडे गृहमंत्री आणि नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. तिथेही त्यांनी डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नक्षलग्रस्त भागातील ग्रामस्थांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. आबांच्या निधनाने एका संयमी, परंतु अतिशय संवेदनशील अशा एका उमद्या राजकीय नेत्याची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
धडाकेबाज निर्णय
च्संत गाडगेबाबा
ग्रामस्वच्छता अभियान
च्महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान
च्डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय
च्टीका होऊनही बंदीवर ठाम राहिले़
च्नक्षलग्रस्त गडचिरोलीचं पालकत्व
च्आदिवासींच्या मुलांना दत्तक घेऊन मुख्य प्रवाहात आणलं
डॉ. संजय उगेमुगे आणि आबा : ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत सावलीसारखे डॉ. संजय उगेमुगे राहिले. ‘मी लवकर बरा होणार आहे, मग घरच्यांना सांगू... उगाच काळजी करतील,’ असे म्हणत पहिले काही दिवस आबांनी घरच्यांनादेखील आजार कळू दिला नाही. मात्र त्यांचे बंधू, आई आणि पत्नी, मुलं काळजी करू लागली तेव्हा घरच्यांना आजाराची कल्पना दिली गेली.
आऱ आऱ पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पाटील कुटुंबीयांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो़ महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रामाणिक नेता त्यांच्या जाण्याने हरपला.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेत उत्कृष्ट काम केले. आमदार, विरोधी पक्षनेते, ग्रामीण विकास मंत्री, गृहमंत्री म्हणून त्यांनी कर्तृत्वाची झलक दाखविली. आर. आर. नाहीत, ही गोष्ट पचवण्यासाठी बराच काळ लागेल.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
निष्कलंक व्यक्तिमत्त्व
सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेला हजरजबाबी नेता हरपला. एक निष्कलंक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. एक संवेदनशील नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि सच्चा माणूस आपल्यातून हिरावला गेला. आणखी काही वर्षे ते लोकशाही व जनतेची सेवा करू शकले असते. हा महाराष्ट्रावर आघात आहे. मी माझ्या राजकीय जीवनात एवढा हजरजबाबी नेता पाहिला नाही. ते त्यांच्या भूमिकेमागील तत्त्वज्ञान स्पष्ट करून सांगत. विधिमंडळात काम करताना अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्वाने त्यांनी मला प्रभावित केले. गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी लक्षणीय होती. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
राजकीय प्रवास
१९७९
सर्वप्रथम जि. प. सदस्य म्हणून निवड
१९९०
तासगावचे आमदार म्हणून निवड
१९९६
काँग्रेसचे विधानसभा प्रतोद म्हणून नियुक्ती
१९९८
विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष
१९९९
ग्रामविकास मंत्री
२००४
गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री
२००८
मुंबई हल्ल्यावेळी वादग्रस्त विधानामुळे
मंत्रिपद गमावलं
२००९
दुसऱ्यांदा गृहमंत्रिपदी नियुक्ती
२००४,
२००९
राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं