पाच कोटींसाठी मुलीचे अपहरण
By admin | Published: July 21, 2016 02:37 AM2016-07-21T02:37:09+5:302016-07-21T02:37:09+5:30
डहाणू येथील एका सुवर्णकाराच्या १२ वर्षीय मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते.
हितेन नाईक,
पालघर- डहाणू येथील एका सुवर्णकाराच्या १२ वर्षीय मुलीचे पाच कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. मात्र पोलिसांनी केवळ १० तासांत महिलेसह पाच खंडणीखोरांना अटक केली आणि मुलीची सुटका केली.
डहाणू येथे सचिन नहार यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. ते डहाणू (मसोली) येथे रहातात. मंगळवारी रात्री नहार कुटुंबीय झोपले असताना त्यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या शिवा भगतने चार साथीदारांसह बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून घरात प्रवेश केला.
बाजूच्या खोलीत झोपलेल्या दियाच्या तोंडात ओढणी कोंबून व चाकू दाखवून आरोपींनी तिचे अपहरण केले. तिला पालघरच्या क्वीन पॅलेस कॉम्प्लेक्सच्या बाथरूममध्ये कोंडून ठेवले.
सकाळी दिया घरात नसल्याचे समजताच कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर दियाच्या आईला तिचे अपहरण केल्याचा अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यांनी नहार कुटुंबाकडे पाच कोटींची मागणी केली. पुन्हा फोन आल्यानंतर दियाच्या आईला आवाज ओळखीचा वाटला. संबंधित आवाज शिवा भगतचा असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी सात पथके तैनात केली. शिवा गुरु कृपा केटरिंगमध्ये कामास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी लक्ष्मण आनंदू भगत, कृष्ण कुमार, राम आशिष राम, पिंकू भिकू तांडेल यांना अटक केली.