रिक्षातून उडी मारून अपहरणाचा डाव उधळला
By admin | Published: October 7, 2016 05:07 AM2016-10-07T05:07:14+5:302016-10-07T05:07:43+5:30
विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला.
पारोळ : विरार खानिवडेजवळ शाळेतील दोन विद्यार्थ्यांना रिक्षातून पळवून नेण्यात येत असता त्यांनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उड्या मारुन पळ काढल्याने अपहरणाचा डाव उधळला गेला.
वसई तालुक्यातील खानिवडे प्रतिभा विद्यामंदिराचे भालिवली येथे राहणारे विद्यार्थी आदित्य किसन घाटाळ इयत्ता ७ वी व विकी सुरेश भोये ६ वी हे दोन विद्यार्थी नेहमी प्रमाणे २९ सप्टेंबर रोजी घरातून खानिवडे शाळेत सकाळी ७.३० च्या सुमारास जात होते. सकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर वर्दळ नव्हती. यावेळी एक अनोळखी रिक्षा त्यांच्या शेजारी येऊन थांबली व त्यात बसलेल्या चालकाने बसा मी तुम्हाला शाळेत सोडतो असे सांगितले. हे दोघेही विद्यार्थी रिक्षात बसले. ती काही अंतरावर पुढे गेल्यानंतर चालकाने दुसऱ्या कुणाशी मोबाईलवर संपर्क साधून हिंदीमध्ये संभाषण करतांना सांगितले कि, दो को हम ले आए है, आप तैयार रहना. हे हिंदी संभाषण आदित्यने ऐकले व आपल्याला काहीतरी धोका असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेव्हा त्याने विकीला खुणेने रिक्षातून उडी मारण्यास सांगितले. रिक्षा सर्व्हिस रोडवरून मुख्य महामार्गावर जात असतांना वेग कमी असल्याने दोघांनीही बाहेर उड्या मारल्या. रिक्षाचालकास हे समजताच त्याने रिक्षा थांबवण्याऐवजी महामार्गावर मुंबई दिशेने निघून गेला . या दरम्यान आदित्यने न घाबरता रिक्षाच्या पाठीमागे नंबर शोधण्यासाठी नजर लावली परंतु रिक्षाला नंबरच नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याचे त्याने या प्रसंगाविषयी बोलताना सांगितले . दरम्यान, तसेच उडी मारताना विकीला मार लागला आहे . दरम्यान भालिवली येथील इतर सवंगडी आल्यावर त्यांच्या बरोबर शाळेत येऊन घडलेला प्रसंग आदित्यने क्लास टीचरला सांगितला. यामुळे पोलिसांनी या रस्त्यावरील गस्त वाढविली आहे. (वार्ताहर)