औरंगाबादमधील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण

By Admin | Published: January 24, 2017 02:47 AM2017-01-24T02:47:58+5:302017-01-24T02:47:58+5:30

अपहृत मुलाने अकोल्यात करून घेतली स्वत:ची सुटका; दोघे अजूनही बेपत्ता.

Abduction of three minor children in Aurangabad | औरंगाबादमधील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण

औरंगाबादमधील तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण

googlenewsNext

अकोला, दि. २३- औरंगाबादमधील बीड बायपास भागातील एका मैदानावर क्रिकेट खेळत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांचे रविवारी सायंकाळी अपहरण केल्यानंतर त्यांना एका पांढर्‍या कारमध्ये डांबून अकोल्यात आणण्यात आले. त्यानंतर अकोल्यातील मनकर्णा प्लॉटमधील एका भंगाराच्या गोदामात गुंगीचे औषध देऊन तीनही मुलांना ठेवलेले असताना यामधील एका मुलाला शुद्ध आल्याने त्याने सोमवारी रात्री १0 वाजताच्या सुमारास स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर हा खळबळजनक प्रकार उघड झाला.
औरंगाबादमधील हरिप्रसाद नगरमधील रोहित बिभीशन आदमाने (११) आणि त्याचे दोन मित्र प्रकाश व संतोष यांच्यासह काही मुले बीड बायपास भागातील एका मैदानावर रविवारी क्रिकेट खेळत असताना एक पांढर्‍या रंगाची मारोती कार त्यांच्या जवळ थांबली. त्या कारमधील एका व्यक्तीने रोहित अदमाने याला जवळ बोलावले आणी तुझ्याकडे पाहुणे आले असून त्यांना तुझे घर दाखव, अशी विनवणी केली. घर दाखविण्याच्या उद्देशाने रोहित कारमध्ये बसताच त्याच्या दोन मित्रांनाही सोबत घेण्यास कारमधील व्यक्तीने सांगितले. त्यानुसार रोहित अदमाने, प्रकाश आणि संतोष हे तिघेही कारमध्ये बसताच त्यांच्या तोंडाला रूमाल लावण्यात आला. त्यामुळे तीनही मुले बेशुद्ध झाली. त्यानंतर त्यांच्यासोबत काय घडले, हे तिघांनाही कळले नाही. रोहित सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शुद्धीवर आला तेव्हा त्याने आजूबाजूला बघितले असता तो भंगारच्या गोदामात असल्याचे त्याच्या लक्षात आले.त्याच्यासोबतच प्रकाश आणि संतोष हे दोघेही बेशुद्धावस्थेत
असल्याचे त्याला दिसून आले; मात्र त्याने मित्रांना सोबत घेण्याच्या नादाला न लागता स्वत:ची सुटका करून घेत तो थेट रेल्वेस्थानकावर पोहचला. तो घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना शोधत असताना रेल्वे राखीव दलाचे जवान गणेश जकाते यांना तो दिसला त्यांनी मुलाची चौकशी केली असता, त्याने घडलेला प्रकार सांगितला. जकाते यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक राजेश बढे यांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदार बढे यांनी पोलीस ताफा सोबत घेऊन मनकर्णा प्लॉटमधील भंगारचे गोदाम गाठले; मात्र तोपर्यंत रोहितचे दोन मित्र प्रकाश व संतोष यांना घेऊन अपहरणकर्ते फरार होण्यात यशस्वी झाले होते. पोलिसांनी अपहरण कर्त्याच्या कारचा शोध घेतला; मात्र कारही दिसून आली नाही. बढे यांनी या प्रकाराची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिली. त्यांनी घटनास्थळीधाव घेतली. त्यानंतर रामदासपेठ पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी गोदामाची सखोल झडती घेतली; मात्र काहीही आढळून आले नाही. रोहित अदमाने या मुलास अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर यांनी स्वत: गाडीत नेले असून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
गोदाममालक पोलिसांच्या जाळय़ात
मनकर्णा प्लॉटमधील भंगाराचे गोदाम हे गवळीपुरा येथील रहिवासी जुम्मा भैरोवाला याच्या मालकीचे आहे. त्याने हे गोदाम अकोट फैलातील एका इसमास भाड्याने दिल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गोदाम मालकास ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा लवकरच छडा लागण्याची शक्यता आहे.
शहरात नाकाबंदी
या प्रकरणानंतर पोलिसांनी शहरासह जिल्हय़ात तातडीने नाकाबंदी केल्याची माहिती आहे. प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू करण्यात आली. मात्र, या दोन अपहृत मुलांचा कोणताही शोध लागलेला नाही. पोलिसांनी मुलांचा शोध युद्धस्तरावर सुरू केला आहे.

अपहृत मुलाने दिलेल्या माहितीवरून आम्ही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु, तिथे गेल्यावर आम्हाला त्याचे दोन मित्र आणि पांढर्‍या रंगाची कार आढळली नाही. या घटनेची माहिती अकोला पोलिसांना दिली असून, पुढील प्रकरणाचा तपास त्यांच्याकडूनच करण्यात येत आहे. मुलालाही अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मुलगा प्रचंड घाबरलेला असून, तो दोन दिवसांपासून बेशुद्धावस्थेत असल्याने त्याला उपचाराची गरज आहे.
राजेश बढे, पोलीस निरीक्षक, आरपीएफ, अकोला.

Web Title: Abduction of three minor children in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.