अब्दुल सत्तार... नया है वह! फडणवीस आणि राऊतांचे एकमत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:48 AM2022-01-06T08:48:31+5:302022-01-06T08:48:49+5:30
पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे अनेक विषयात दुमत असले तरी अब्दुल सत्तारांविषयी मात्र एकमत झाल्याचे चित्र आहे. सत्तार यांच्या विधानांवर दोन्ही नेत्यांनी ‘नया है वह’चा सूर आळवला आहे.
शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना - भाजप युतीबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युतीचा पूल उभारू शकतील, असे म्हटले होते. यावर फडणवीस आणि राऊत या दोन्ही नेत्यांनी जवळपास सारखीच प्रतिक्रिया दिली आहे. सत्तारांच्या विधानाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, नितीन गडकरी आमचे मोठे नेते आहेत. ते युती घडवून आणू शकतात, असे सत्तारांना वाटते, पण सत्तार नया है वह. त्यांना शिवसेनेचे काहीच माहीत नाही. मला वाटते गेल्या पाच - सात महिन्यांत ते कधी उद्धव ठाकरे यांनाही भेटले नसतील. युतीबाबत बोलायला कोणी महत्त्वाचा माणूस लागतो ना, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.
तर, युतीबाबत कोण बोलत आहे, कोणी प्रमुख नेता बोलतोय का, हे आधी तपासून घ्या, असे राऊत म्हणाले. सत्तार अजून शिवसेनेत नवे आहेत. हे जे मंत्री आहेत, त्यांनी पक्षात २५ वर्ष पूर्ण केली, तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्ण लागायची आहे. दुसरे कोणी प्रमुख लोकांपैकी बोलत आहे का, असा प्रश्न करत सत्तार यांची विधाने संजय राऊत यांनी निकाली काढली.
पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत, त्यांना पुढची किमान २० वर्षे शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे. सत्तार काँग्रेसमधून आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. अशी विधाने करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल, वाद निर्माण होतील, असे कोणी करू नये, असेही राऊत म्हणाले.