मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तार यांच्यात ३ तास खलबतं; फडणवीसांशीही साधला संवाद, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 10:48 AM2024-09-05T10:48:48+5:302024-09-05T10:51:25+5:30
अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे.
जालना : शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतली. अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल ३ तास चर्चा झाली आहे. दरम्यान, या बैठकीवेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अतिवृष्टीमुळे अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, यासह मराठा आरक्षणासच्या मागणीबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. याशिवाय, शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरती चर्चा झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते म्हणाले की, आज मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले, नुकसान झालेले आहे. सरकारकडे आता केवळ ६० दिवस उरले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मनोज जरांगे पाटील यांची सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट बैठकीत मांडणार आहे. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्याचे दिसून येत आहे.