अब्दुल सत्तारांकडून राजकीय भूकंप; विखे पाटलांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 22, 2020 11:25 PM2020-11-22T23:25:59+5:302020-11-22T23:29:31+5:30
खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले.
अहमदनगर -शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला. त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. यावर, आमची कसल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र, असे असले तरी, सत्तारांच्या या ऑफरमुळे विखेपाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे एका कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले असता त्यांनी विखे पाटलांना ही ऑफर दिली.
"विखे पाटील हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे. मात्र, मी तर शिवसेनेत फक्त ऑफर देणारा आहे. परंतू आमचे पक्ष प्रमुख अंतिम निर्णय घेतात आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. त्यांनाही शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे आणि निश्चितपणे त्याचा परिणाम भविष्यात दिसेल," असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
सत्तार यांच्या ऑफर नंतर, काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली. "अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज ग्रामीण विकास विभागाचा कार्यक्रम होता पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. यासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही," असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले.
अब्दुल सत्तार यांच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टिकरण दिले असले, तरी राजकारणात काहीही होवू शकते. त्यामुळे ते उद्या शिवसेनेत दिसले तर नवल नाही, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.