रावसाहेब दानवेंचा परतीचा प्रवास सुरू झाला: अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 05:28 PM2019-11-19T17:28:46+5:302019-11-19T17:31:32+5:30
भाजप-शिवसेना पक्षात निर्माण झालेल्या वादानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई : राज्यात एकीकडे सत्ता स्थापन करण्यावरुन रणकंदन सुरू असताना तिकडे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद काही थांबायचे नाव घेत नाही. सत्तार यांच्या डोक्यावर अजून पाच वर्षे केस उगवण्याची शक्यता कमी असल्याची टीका दोन दिवसांपूर्वी दानवे यांनी केली होती. तर रावसाहेब दानवेंचा परतीचा प्रवास सुरू झाला असल्याचे प्रतिउत्तर सत्तारांकडून देण्यात आले आहे.
मतांसाठी दानवे यांनी आपल्या मतदारसंघात हिंदुत्ववाद डावावर लावला होता. त्यामुळे लोकं जोड्याने मारू लागले आहेत, हे दानवे यांनी विसरू नयेत. तसेच दानवे यांना खासदार करून आमचीच चूक झाली असल्याचे सत्तार म्हणाले होते. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर आले असताना एका वृत्तवाहिनीला प्रतिकिया देताना सत्तार असे म्हणाले होते.
तर या टीकेला उत्तर देताना, सत्तार यांच्या डोक्यावर अजून पाच वर्षेतरी केस उगवणार नाहीत. त्यामुळे त्यांना टक्कल घेऊनचं फिरावे लागणार असल्याचा टोला दानवेंनी लगावला होता. तर दानवेंना आता सत्तार यांनी पुन्हा प्रतिउत्तर दिले आहे. रावसाहेब दानवे यांना सेनेवर टीका करण्याचा अधिकार नाही.रावसाहेब दानवे यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे, त्यांना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. असे सत्तार म्हणाले आहे.एका वृत्तवाहिनीला प्रतिकिया देताना ते बोलत होते.
लोकसभा-निवडणूक असोत की विधानसभा प्रत्येक निवडणुकीत एकमेकांना मदत करुन शेजार धर्म पाळतात अशी ओळख कधीकाळी अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांची राहलेली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी या दोन्ही नेत्यांमध्ये अचानक कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला होता. त्यावेळी सत्तार हे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते. त्यातच आता भाजप-शिवसेना पक्षात निर्माण झालेल्या वादानंतर ह्या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात दंड थोपटले असल्याचे पाहायला मिळत आहे.