तर बच्चू कडूंनी सरकारमधून बाहेर पडावे : अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 10:48 AM2020-02-08T10:48:19+5:302020-02-08T10:49:08+5:30
दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती.
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने केलेली दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली होती. त्यांच्या या विधानाने महाविकास आघाडीमधील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे. तर बच्चू कडू यांना दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं असल्याचं वाटत असेल त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा टोला राज्यमंत्री व शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी लगावला आहे.
आळंदी येथे वारकऱ्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलतानी बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीवर भाष्य केलं होत. सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केले होते.
यावरून बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा 80 टक्के फायदा होणार आहे. तसेच ही कर्जमाफीअंतिम नसून, हा पहिला टप्पा आहे. शासनाच्या तिजोरीत जसा-जसा पैसा येईल तसे शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि कर्जमाफीबद्दल निर्णय घेतली जाणार आहे. मात्र असे असूनही, बच्चू कडू ज्या सरकारमध्ये आहे त्या सरकारची कर्जमाफी त्यांना बुजगावणं असल्याचं वाटत असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा खोचक सल्ला सत्तार यांनी यावेळी दिला.