Abdul Sattar Vs Supriya Sule : २४ तासांत सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राष्ट्रवादीचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:19 PM2022-11-07T16:19:23+5:302022-11-07T16:19:29+5:30
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे.
शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचे समोर आले आहे. यावरुन आता राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर पन्नास खोकेवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणार्या मंत्री अब्दुल सत्तार यांची २४ तासाच्या आत मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. “विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे,” असे म्हणत तपासे यांनी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध केला.
“”खासदार सुप्रिया सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिलाय.
नक्की काय घडलं?
विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करण्यात आली.
अब्दुल सत्तारांची माफी
सुप्रिया सुळेंवरील खालच्या पातळीच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत मोठा संताप उफाळून आला आहे. हा विरोध पाहता सत्तारांनी माफी मागितली. माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो, असं वक्तव्य त्यांनी केलं.