'भावना दुखावल्या असतील तर सॉरी म्हणतो...' 'त्या' वक्तव्यावर अब्दुल सत्तारांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 04:09 PM2022-11-07T16:09:03+5:302022-11-07T16:10:10+5:30
अब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळेंवर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर खालच्या पातळीची टीका केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अब्दुल सत्तारांनी माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून होत आहे. तसेच, सत्तारांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने करत आहेत. या सर्व गोंधळानंतर अखेर अब्दुल सत्तारांनी माफी मागितली आहे.
काय म्हणाले होते अब्दुल सत्तार?
विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर सतत खोके घेतल्याची टीका केली जाते. यावरुन अब्दुल सत्तार म्हणाले की, 'आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार## आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही सत्तारांनी अशाच प्रकारचा उल्लेख केला. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राष्ट्रवादीचे समर्थक आक्रमक झाले असून, सत्तारांच्या माफीची मागणी करत आहेत.
अब्दुल सत्तारांची माफी
सुप्रिया सुळेंवरील खालच्या पातळीच्या टीकेनंतर राष्ट्रवादीत मोठा संताप उफाळून आला आहे. हा विरोध पाहता सत्तारांनी माफी मागितली. माध्यमांशी संवाद साधताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कोणत्याही महिलेचा अपमान केलेला नाही. आमची तशी संस्कृती नाही. माझ्या वाक्यामध्ये सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द नाहीत. मी आमच्यावर टीका करणाऱ्यांना तो शब्द वापरला आहे. तरीदेखील कोणत्या महिलेच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी सॉरी म्हणतो, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीकडून तीव्र विरोध
अब्दुल सत्तारांनी 24 तासात माफी मागावी, असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे. यांना 50 खोक्यांची मस्ती आली आहे, यांची मस्ती उतरवली जाईल, असं राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे. तसेच, दहा पक्ष बदलणारे सत्तार हे सत्तार आहेत की सुतार आहेत. अब्दुल सत्तारांना सत्तेची मस्ती आलीय, ही मस्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिरवेल. सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिला.