Abdul Sattar News: अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुली टीईटी घोटाळ्यात? यादी व्हायरल झाल्याने खळबळ; सत्तार म्हणतात, त्यांना नोकरी मिळाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 10:30 AM2022-08-08T10:30:29+5:302022-08-08T10:31:01+5:30
Abdul Sattar's daughters in TET scam News: शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली असून, यावर योग्य चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून टीईटी घोटाळा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. हजारो शिक्षकांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. ज्यांना नोकरी मिळालेली नाही, त्या उमेदवारांना पुन्हा कधीच टीईटी देता येणार नाही. अशातच शिवसेनेचे शिंदे गटातील बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे या टीईटी घोटाळ्याच्या यादीत दिसल्याने खळबळ उडाली आहे.
यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली असून, यावर योग्य चौकशी आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या यादीतील नावावर अब्दुल सत्तार यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. टीईटीची ती यादी फेक आहे. माझा किंवा माझ्या कुटुंबाचा याच्याशी काही संबंध नाही. जे यात दोषी असतील त्यांना फासावर लटकवा, असे सत्तार म्हणाले आहेत.
सध्या सोशल मीडियावर एक यादी व्हायरल झाली आहे. यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी दोन नावे आहेत. या नावांवर देखील सत्तार यांनी आक्षेप घेतला आहे. मी अब्दुल सत्तार आहे त्यांच्या नावात पुढे शेख लावले आहे. या नावांतही तफावत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.
त्या परीक्षेत जर माझ्या मुली पात्र झाल्या असतील तर त्याचे प्रमाणपत्र अद्याप त्यांना मिळालेले नाही. किंवा ते प्रमाणपत्र त्यांनी कुठे दाखवून नोकरी मिळवलेली नाही. त्या २०१५ मध्येच नोकरीला लागलेल्या आहेत. त्यांनी टीईटीच्या प्रमाण पत्राने नोकरी मिळवलेली नाही. माझ्या मुलीचे लग्न झालेले आहे. शिक्षण विभागात चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल.
-आ अब्दुल सत्तार