‘अबकी बार, नीतेश आमदार’

By admin | Published: October 12, 2014 10:24 PM2014-10-12T22:24:08+5:302014-10-12T23:35:06+5:30

नारायण राणेंचे भावनिक आवाहन : देवगड येथे काँग्रेसची प्रचारसभा

'Abeki Bar, Nitesh MLA' | ‘अबकी बार, नीतेश आमदार’

‘अबकी बार, नीतेश आमदार’

Next

देवगड : ‘अबकी बार नीतेश आमदार’ असे भावनिक आवाहन देवगडवासीयांना करताना माजी पालकमंत्री व उद्योगमंत्री नारायण राणे हे अचानक पित्याच्या भूमिकेत गेलेले इंद्रप्रस्थ सभागृहातील प्रचारसभेमध्ये रविवारी सायंकाळी उपस्थितांनी पाहिले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय निरीक्षक व खासदार के. सुरेश, खासदार भालचंद्र मुणगेकर, उमेदवार नीतेश राणे, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, डॉ. मिलिंद कुळकर्णी, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, सभापती डॉ. मनोज सारंग व अन्य मान्यवर उपस्थित होते.यावेळी आपल्या घणाघाती भाषणात नारायण राणे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांसह भाजपा उमेदवार प्रमोद जठार यांच्यावर हल्ला चढविला. मोदी हे पंतप्रधान असूनही कुटुंबप्रमुखासारखे न वागता महाराष्ट्राच्या अस्मितेवरच घाव घालत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्र तोडून येथील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेण्याचा मोदींचा डाव असून जेएनपीटीसारखी बंदरे ओसाड पाडण्याची खेळी मोदी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व महत्वाचे प्रकल्प, उदाहरणार्थ काश्मिरमधील रेल्वे, स्कील डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ही मनमोहन सरकारची गेल्या १० वर्षातील कामगिरी असताना फक्त उद्घाटनाचे धनी होऊन मोदी ‘आयत्या बिळावरचे नागोबा’ असल्याचा आरोप करीत फक्त खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे या मंत्राचा वापर आपल्या सर्व सभांमध्ये करीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
गेल्या ३० वर्षात देवगडमध्ये भाजपाचा आमदार असताना देवगड मालवण व कणकवली, कुडाळ यापेक्षा अनेकपट मागे असून त्याचे सर्व पाप याच आमदारांच्या नाकर्तेपणाची साक्ष असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. नीतेश हा तरुणाईचे प्रतिक असून त्यांचे आशास्थान बनेल व म्हणूनच त्याला देवगडवासीयांनी आता संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्यसभा खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. मिलिंद कुळकर्णी यांनी आपल्या भाषणात नीतेश राणेंच्या विकासात्मक आराखडा, व्हिजन डॉक्युमेंट यांचा आढावा घेतला. तसेच संदेश पारकर, नवी मुंबईचे माजी महापौर चंदू राणे, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, केंद्रीय पक्ष निरीक्षक के. सुरेश, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनीही आपले विचार व्यक्त केले.
पराभवाचा वचपा काढा
इंद्रप्रस्थ सभागृह खचाखच भरल्यामुळे सभागृहाच्या बाहेर व कडेने शेकडो कार्यकर्ते उभे राहून भाषणे ऐकत होते. सभागृहस्थळी नारायण राणे यांचे सायंकाळी ५.३० वाजता आगमन झाल्यावर स्वागतपर घोषणांनी सभागृह दणाणून गेले. लोकसभेतील पराभवाचा वचपा यावेळी ५० हजारांच्या बहुमताने नीतेश यांना निवडून देऊन आपण काढा, असेही आवाहन नारायण राणे यांनी केले. (प्रतिनिधी)

कृतीतून विकास घडवेन : नीतेश राणे
यावेळी आपले विचार व्यक्त करताना नीतेश राणे म्हणाले की, भाजपा आमदाराने सर्व कामांचे खोटे श्रेय घेण्याव्यतिरिक्त आपल्या प्रगतीपुस्तकात काहीही नमूद केलेले नाही. तारामुंबरी पूल हा खासदार भालचंद्र मुणगेकरांच्या अथक प्रयत्नांचे फळ असून तत्कालीन खासदार नीलेश राणेंच्या पाठपुराव्याचे फलित आहे, याचे महत्त्व नीतेश राणेंनी अधोरेखित केले. देवगडमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी व सामान्य माणसाच्या भविष्याच्या उज्ज्वल वाटेसाठी मतदान करून आपल्याला निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. देवगड-कणकवली व वैभववाडीसाठी स्वतंत्र विकास आराखडा व व्हिजन डॉक्युमेंट हे नुसते प्रचार तंत्र नसून प्रत्यक्ष काम करण्यासाठी प्रयत्नांचा लेखाजोखा आहे व त्याप्रमाणे काम करून दाखविण्याचा विश्वास त्यांनी जनतेला दिला. आपल्या प्रयत्नांमुळे व विकासकामांमुळे प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींना दखल घेऊन आपल्या मतदारसंघात सभा घेण्याची गरज पडावी यातच सर्व आहे, असे नीतेश राणे म्हणाले.

Web Title: 'Abeki Bar, Nitesh MLA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.