अबब..! मूत्राशयातून काढले ५१ खडे.!
By admin | Published: January 21, 2015 12:30 AM2015-01-21T00:30:05+5:302015-01-21T00:30:05+5:30
मूत्रपिंडात खडा होण्याचे प्रकार आपण ऐकले आहेत. ‘‘तुमच्या मूत्रपिंडात १, २ एमएमचा खडा आहे,’’ असे डॉक्टर सर्रास सांगतात.
पुणे : मूत्रपिंडात खडा होण्याचे प्रकार आपण ऐकले आहेत. ‘‘तुमच्या मूत्रपिंडात १, २ एमएमचा खडा आहे,’’ असे डॉक्टर सर्रास सांगतात. पण, मोठ्या व्यक्तींच्या मूत्राशयामध्ये खडे झाले, असे सहसा ऐकिवात नाही. पण, एका रुग्णाच्या मूत्राशयातून शस्त्रक्रिया करून एक-दोन नव्हे, तर तब्बल ५१ खडे काढण्याची घटना ससून रुग्णालयात घडली. महत्त्वाचे म्हणजे, हिमोफिलिया रुग्णावर ससूनच्या डॉक्टरांनी जोखमीची असणारी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.
संतोष हिरवे (वय २१) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर ससूनमधील सर्जरी विभागाचे प्रा. डॉ. सुधीर डुबे, सहायक प्रा. आविष्कार बारसे, मुख्य निवासी डॉक्टर वैभव शाह, भूलतज्ज्ञ डॉ. ए. पांडे, विजय पाटील यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
संतोषला हिमोफिलिया हा आजार आहे. संतोषच्या पोटात सारखे दुखायचे आणि चक्कर यायची. त्यामुळे त्याने काही खासगी डॉक्टरांना दाखविले. त्यांनी आजाराचे निदान केले; पण शस्त्रक्रिया करू शकत नसल्याचे सांगितले. हिमोफिलिया रुग्णांमध्ये अतिरिक्तस्राव होण्याचा धोका असतो. यामुळे हिरवे याच्यावर अनेक खासगी डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करणे टाळण्यात येत होते.
संतोष त्याच्या आई आणि भावाबरोबर राहतो. संतोषची आई भाजीविक्रीचा व्यवसाय करते. संतोषला खासगी डॉक्टरांकडून तपासणी करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे तो ससूनमध्ये आला.
याबाबत डॉ. डुबे म्हणाले, ‘‘संतोषवर आम्ही तपासणी, उपचार करून शस्त्रक्रिया केली. नियोजन करून करण्यात आलेली ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे.’’
‘‘ससूनमध्ये आल्यावर इथल्या डॉक्टरांनी मला धीर दिला आणि माझ्यावर शस्त्रक्रिया करून मला एक प्रकारे जीवनदानच दिले,’’ अशी प्रतिक्रिया संतोष हिरवे याने दिली. या शस्त्रक्रियेत हिमोफिलिया सोसायटीचे डॉ. सुनील लोहाडे, राजीव गांधी योजनेच्या प्रमुख डॉ. भारती दासवानी, परिचारिका मनीषा भुजबळ, कर्मचारी सुबैया यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. (प्रतिनिधी)
हिमोफिलियाचे
७०० रुग्ण
पुण्यात हिमोफिलिया सोसायटीकडे नोंदणी केलेले ७०० रुग्ण आहेत. हीमोफिलिया हा पुरुषांमध्ये आढळणारा आजार असून, संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारे इजा झाल्यास त्यामुळे होणारा रक्तस्राव लवकर थांबत नाही. अतिरक्तस्राव झाल्यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती हिमोफिलिया सोसायटीचे डॉ. सुनील लोहाडे यांनी दिली.