अभय कुरुंदकर, फळणीकर यांच्या घरावर छापे, मदत करणारे दोघे पोलीस रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 04:53 PM2018-03-10T16:53:26+5:302018-03-10T16:57:18+5:30
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणात संशयित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि साक्षीदार महेश फळणीकर यांच्या घरावर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी छापे टाकून महत्वाचे धागेदोरे ताब्यात घेतले.
कोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणात संशयित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि साक्षीदार महेश फळणीकर यांच्या घरावर मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी छापे टाकून महत्वाचे धागेदोरे ताब्यात घेतले.
महेश फळणीकर याच्या आजरा येथील घरावरही या पथकाने छापा टाकला.
मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अश्विनी बिद्रे खून प्रकरणाच्या तपासासाठी सध्या कोल्हापूरात ठाण मांडले आहे. शनिवारी या गुन्ह्याच्या प्रमुख तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो यांनी कोल्हापूरातील राजेंद्रनगर एसएससी बोर्ड परिसरातील अभय कुरुंदकर याच्या घरावर छापा टाकला. त्यानंतर महेश फळणीकर याच्या आजरा येथील घरावरही या पथकाने छापा टाकला.
तपास पथकाला या दोन्ही ठिकाणी मह त्वाचे धागेदोरे हाती आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी या तपासपथकाने कंबर कसली असून त्यांनी कोल्हापूर परिसरात ठाण मांडले आहे. तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो यांच्यासह या तपास पथकामध्ये सातजणांचा समावेश असून ते कसून तपास करीत आहेत.
दरम्यान, दोन वर्षापूर्वी अभय कुरुंदकरच्या संपर्कात असलेल्या कोल्हापूर पोलीस दलातील दोघा पोलिसांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे. हे दोघेही पोलिस कर्मचारी मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यांचे दोन वर्षांपासूनचे कॉल डिटेल्स तपासले जात असून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग केले जात आहेत.
मृत अश्विनी बिद्रे यांना कुरुंदकर कोल्हापुरात फ्लॅट घेऊन देणार होता, त्यासाठी फ्लॅट पाहून त्याचा व्यवहार करून देण्याची जबाबदारी संबंधित दोन पोलीस कर्मचारी करणार होते. या धक्कादायक माहितीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
अभय कुरुंदकरचा पोलीस दलात चांगलाच वचक होता. कोल्हापूर पोलीस दलातील अनेक पोलीस त्याच्या संपर्कात असायचे. गेल्या दोन वर्षांत कुरुंदकरच्या मोबाईल कॉल डिटेल्समध्ये कोल्हापुरातील दोघा पोलिसांना वारंवार फोन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांचा संवाद काय झाला. बिद्रे खूनप्रकरणात त्यांचा सहभाग आहे काय? अशा शंका पुढे आल्याने या दोघा पोलिसांना चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.