Video : “…तर माझा अर्ज जाणारच, आमदार-खासदारांच्या संपर्कात"; अभिजित बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:05 AM2022-06-17T00:05:27+5:302022-06-17T00:36:15+5:30
राष्ट्रपती होणं किंवा पंतप्रधान होणं हे सर्व करून दाखवायचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे - अभिजित बिचुकले
सध्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये उमेदवारीवरून चर्चांच्या फैरी सुरू आहेत. परंतु अशातच आता आणखी एक नाव राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे आणि ते नाव म्हणजे अभिजित बिचुकले यांचं. “हे सत्य आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे. मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. परंतु त्यावेळी त्यांनी कोणीतरी कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचं राष्ट्रपतीपद दिलं. त्यांना बहुमतामळे ते जमलं,” असं बिचुकले म्हणाले.
“आता माझा असा एक डावपेच सुरू आहे, आपल्या न्यायपालिका असतील, केंद्रातील निर्णय असतील, त्या सिस्टम राष्ट्रपतीपदाची जी ताकद आहे या सगळ्या ताकदी राष्ट्रपतीपदाच्या दबावाखाली असतात. म्हणून त्या पदावरून योग्य निर्णय घेऊ शकत नाही. राष्ट्रपतींनी बऱ्याच गोष्टी देशासाठी करायच्या आहेत. पण त्या करत नाहीत, म्हणून मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार. अर्ज जोवर मी भरत नाही तोवर मला गुपित ठेवायचं होतं,” असंही बिचुकले म्हणाले. लोकमतशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं.
आमदार खासदारांचं अनुमोदन मिळणं गरजेचं आहे. ही गोष्ट अवघड आहे. ते पक्षाशी बांधीलही असतात. त्यांना व्हिप असतं, चमचेगिरी करण्यात पटाईत आहेत. हा अर्ज भरण्यात जरी मी यशस्वी झालो नाही तरी पुढच्या राजकारणातून मी लांब गेलो नाही, असंही ते म्हणाले. भारताच्या राष्ट्रीय राजकारणात मी आहेच असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रपती होणं किंवा पंतप्रधान होणं हे सर्व करून दाखवचं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान हे चहावाले, मी पेढेवाला हा मोठा फरक आहे. त्यांना कौटुंबीक जीवनातलं काही माहिती नाही. त्यांना घर चालवायची माहिती नाही संविधानामुळे पंतप्रधान होतात. ते संविधान मला लढण्याची शक्ती देतं, मी लढत राहणार असल्याचंही ते म्हणाले.