आशियाई कबड्डी: महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा सत्कार, प्रत्येकी सात लाखाचा धनादेश सूपूर्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 04:16 PM2017-12-08T16:16:51+5:302017-12-08T16:18:06+5:30
आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला.
मुंबई : आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते आज मंत्रालयात सत्कार करण्यात आला. सायली जाधव यांना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.
कर्णधार म्हात्रे व जाधव यांनी आज क्रीडा मंत्री तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी या दोघींना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी सात लाख रुपयांचा धनादेश आणि शाल देवून तावडे यांनी सत्कार केला.
सायली जाधव यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा उचित गौरव राज्य शासन करत आहेत. विविध पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांच्या खेळाचे तावडे यांनी कौतुक केले. महाराष्ट्राच्या या दोन्ही कबड्डीपटूंना आंतरराष्ट्रीय जागतिक स्पर्धेमध्ये जी संधी मिळाली त्या संधीचे त्यांना विजयामध्ये रुपांतर केले आणि केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे नाव कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले या शब्दात तावडे यांनी त्यांचा गौरव केला.