गडकरींमध्ये स्वप्नातलं जग सत्यात उतरवण्याची क्षमता - विजय दर्डा

By admin | Published: September 13, 2016 11:32 AM2016-09-13T11:32:20+5:302016-09-13T11:57:53+5:30

नितीन गडकरींनी नेहमी स्वप्नातील जग दाखवलं असून ते सत्यात उतरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे असा विश्वास विजय दर्डा यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ दरम्यान बोलताना व्यक्त केला आहे

The ability to prove the dream world in Gadkari - Vijay Darda | गडकरींमध्ये स्वप्नातलं जग सत्यात उतरवण्याची क्षमता - विजय दर्डा

गडकरींमध्ये स्वप्नातलं जग सत्यात उतरवण्याची क्षमता - विजय दर्डा

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 -  नितीन गडकरींनी नेहमी स्वप्नातील जग दाखवलं असून ते सत्यात उतरवण्याची क्षमता त्यांच्यात आहे. एक्स्प्रेस हायवे आणि फ्लायओव्हर याची चांगली उदाहरणं आहेत असा विश्वास एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’ दरम्यान बोलताना व्यक्त केला आहे. मेक इन इंडिया आणि मूव्ह इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची ड्रीम प्रोजेक्ट आहेत. मात्र केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे, यामध्ये लक्ष घालावं अशी विनंतीही विजय दर्डा यांनी नितीन गडकरींना यावेळी केली. 
 
बंदरांवर मिळणा-या मंजुरींचा आणि ट्रकचा सरासरी वेग वाढवण्यात यावा तसंच हायवे - रस्त्यांच्या बांधकामाची मर्यादा 21 वरुन 42 किमीवर नेण्यात यावी असंही विजय दर्डा बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी 760 किमीच्या समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणा-या नागपूर-मुंबई महामार्गांचा महत्वाकांक्षी प्रकल्प ठेवला आहे. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही यावर काम करत आहेत याचा मला आनंद असल्याची प्रतिक्रिया विजय दर्डा यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
राज्यातील पायाभूत सुविधांची सद्य:स्थिती व भविष्यातील नियोजनाचा वेध घेण्यासाठी  ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’चं आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हॉटेल ‘ग्रॅण्ड हयात’मध्ये या कॉनक्लेव्हचे आयोजन करण्यात आलं आहे. 
 
‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये रस्ते, जलवाहतूक आणि राज्यातील पायाभूत सुविधा या विषयांवर सविस्तर आणि उद्बोधक चर्चा होत आहे. त्यातून राज्याच्या व देशाच्या प्रगतीला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासाची दिशा स्पष्ट होईल. देशभरातील रस्ते-महामार्ग, बंदरे आणि जहाज वाहतूक आणि व्हिजन महाराष्ट्र अशा तीन विषयांवर मंथन होणार असून दिवसभर ही चर्चा चालणार आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत.
रस्ते विकासाच्या चर्चासत्रात ‘येस बँक’चे संजय पालवे, ‘एल अ‍ॅण्ड टी फायनान्स लिमिटेड’चे वाय.एम. देवस्थळी, ‘एनएचएआय’चे राघव चंद्रा, ‘एमईपी इन्फ्रा’चे जयंत म्हैसकर, ‘टॉप वर्थ’चे अभय लोढा यांचा समावेश असेल.
 
बंदर विकासाच्या चर्चासत्रात येस बँकेचे विनोद बहेती, मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटिया, केंद्र सरकारचे प्रतिनिधी आर. के. अगरवाल, ‘इनलॅण्ड वॉटरवेज’चे परवीर पांडे, ‘जेएनपीटी’चे नीरज बन्सल यांचा सहभाग असेल. राज्यातील पायाभूत सुविधा आणि व्हिजन महाराष्ट्र या चर्चासत्रात ‘एमआयडीसी’चे संजय सेठी, ‘सिडको’चे भूषण गगराणी, ‘एमएमआरडीए’चे यू. पी. एस. मदान, ‘एमएसआरडीसी’चे आर. एल. मोपलवार, ‘मुंबई मेट्रो-३’च्या अश्विनी भिडे, महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी मिलिंद म्हैसकर या तज्ज्ञांचा समावेश असेल. तिन्ही सत्रांनंतर प्रश्नोत्तरांचे सत्रही होईल. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठी आहे. 
 

Web Title: The ability to prove the dream world in Gadkari - Vijay Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.