आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा अन्नत्याग!
By admin | Published: August 13, 2015 01:58 AM2015-08-13T01:58:52+5:302015-08-13T01:58:52+5:30
प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे.
अकोला : प्रशासन विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत गंभीर नसल्याचा आरोप करीत अकोल्याच्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गत तीन दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. प्रशासन मात्र ढिम्मच राहिल्याने, संतप्त विद्यार्थ्यांनी बुधवारी वसतिगृहातील साहित्याची नासधूस केली आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले.
अकोला शहराच्या कृषिनगर परिसरात आदिवासी मुलांचे हे वसतिगृह आहे. त्याच्या छताला गळती लागल्याने शॉर्टसर्किटचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शिवाय सर्वच खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने शैक्षणिक साहित्य व इतर महत्त्वाच्या वस्तू भिजत आहेत. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याला धोका झाला आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराला कंटाळून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले; परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी सोमवारपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल न झाल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले आणि इमारतीवरून तेथील वस्तूंची फेकाफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र मागण्या मान्य होईस्तोवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अधिकाऱ्यांशी बोलण्यास नकार दिला.
इमारतीला गळती लागली असून, ही गंभीर समस्या आहे. ती निकाली लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इतर समस्यांबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
- नितीन तायडे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास मंडळ, अकोला
विद्यार्थी आजारी
मूलभूत सुविधांसाठी गत तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केल्याने दोन विद्यार्थी आजारी पडले. त्यांना सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.