पक्षांतरामुळे वैभव पिचडांपासून दुरावणार आदिवासी मते !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:14 PM2019-07-25T12:14:43+5:302019-07-25T12:16:11+5:30
धनगर आरक्षणाचा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. मात्र वैभव पिचड यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास आघाडीकडे वळविलेल्या आदिवासी मतदारांना परत युतीशी जोडणे कठिण आहे. एकूणच पक्षांतरामुळे वैभव पिचड यांना आदिवासी मतांना मुकावे लागेल अशी शक्यता आहे.
मुंबई - अकोले मतदार संघाचे आमदार वैभव पिचड यांच्या पक्ष बदलाची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. पिचड भाजपवासी होणार की शिवसेनेत जाणार याकडे तालुक्यातील पिचड समर्थकांसह सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. मात्र पक्षांतरामुळे वैभव पिचड यांना आदिवासी मतांवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला याच आदिवासी मतांच्या जोरावरच आघाडी मिळवून दिली होती.
वैभव पिचड नेमके कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र युती झाल्यास अकोलेची जागा सेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे सेनेमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीने अभूतपूर्व यश मिळवले. अनेक विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवारांनी आघाडी मिळवली. परंतु, अकोले मतदार संघात ती कामगिरी करण्यात युतीला अपयश आले. वास्तविक पाहता, अकोले विधानसभा मतदार संघातून २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेला आघाडी मिळाली होती. यावेळी मात्र येथील मतदारांना भाजप-शिवसेना युतीला डावलल्याचे दिसून आले. यामध्ये वैभव पिचड यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
लोकसभेला या मतदार संघात धनगर आरक्षणाचा मुद्दा आघाडीच्या पथ्यावर पडला. धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल, या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. यासाठी वैभव पिचड आणि मधुकर पिचड या पुता-पुत्रांनी आदिवासींमध्ये युती धनगर आरक्षणाच्या बाजूने असल्याचे बिंबवले होते. धनगर समाजाला एसटीमध्ये समाविष्ट केल्यास आदिवासी समाजाचे आरक्षण विभागले जाणार आहे.
धनगर आरक्षणाचा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. मात्र वैभव पिचड यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास आघाडीकडे वळविलेल्या आदिवासी मतदारांना परत युतीशी जोडणे कठिण आहे. एकूणच पक्षांतरामुळे वैभव पिचड यांना आदिवासी मतांना मुकावे लागेल अशी शक्यता आहे.