वंशाच्या दिव्यासाठी गर्भपाताची औषधे, मेजर बाबाचा आणखी एक प्रताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 05:51 AM2018-08-14T05:51:31+5:302018-08-14T05:53:10+5:30
स्मशानातील कोळसा, राख याच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंग बदलाचा दावा करणारा बाबा वंशाच्या दिव्यासाठी गर्भपातासाठीही औषध देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
- मनीषा म्हात्रे
मुंबई - स्मशानातील कोळसा, राख याच्यासह फक्त औषधाने गर्भलिंग, लिंग बदलाचा दावा करणारा बाबा वंशाच्या दिव्यासाठी गर्भपातासाठीही औषध देत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गर्भधारणेपूर्वी येणाऱ्या मासिक पाळीच्या तारखेवरून मुलगा होणार की मुलगी याचे निदान करायचे. त्यात मुलगी होणार हे समजताच, बाबा गर्भपाताचेही औषध त्यांना देत होता.
पारनेरच्या कान्हुर पठार या खेडेगावात राहणाऱ्या मेजर बाबा विजय ठुबेच्या दाव्यानुसार, परदेशातही त्याच्या औषधांमुळे अपत्यप्राप्ती झाली आहे. यामध्ये आॅस्टेÑलिया, न्यू झीलंड, अमेरिकेचाही समावेश असून त्यांच्याही नोंदी बाबाच्या हिशोबाच्या वह्यांमध्ये आहेत.
बाबांच्या दरबारी वंशाच्या दिव्यासाठीही नागरिकांच्या रांगा लागत असल्याचा दावा बाबा करतो. त्यात मुलगी हवी की मुलगा यावर तो औषध देत होता. फक्त गर्भवती महिलेचे नाव आणि गर्भधारणेपूर्वीच्या तारखेवरून मुलगा होणार की मुलगी हे बाबा सांगायचा. त्यामुळे त्याच्याकडे बरीच लोक मुलगा होणार, की मुलगी हे माहीत करून घेण्यासाठीही येत असत.
बाबाच्या मते त्याने केलेले मुलगा किंवा मुलीच्या बाबतचे अनुमान ९० टक्के खरे ठरायचे. याच अनुमानादरम्यान एखाद्या दाम्पत्याला मुलगी होणार असल्याचे समजताच, ते वंशाच्या दिव्यासाठी बाबाकडे मागणी करायचे. त्या वेळेस मुलीच्या गर्भपातासाठी तो औषध देत असे.
त्यानंतर मुलगा व्हावा यासाठीचे औषध महिलेला खाण्यास देत होता. त्यातून त्यांना मुलगाच होत असल्याचा धक्कादायक खुलासा बाबाने ह्यस्टिंगह्णदरम्यान केला आहे. अशा स्वरूपाची सद्य:स्थितीत १५ प्रकरणे त्याच्याकडे असल्याचेही तो सांगतो. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतराव गाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित स्टिंगदरम्यान केलेले छायाचित्रण, ध्वनिफितीच्या आधारे तपास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यांतर्गत होणार चौकशी
पारनेरच्या मेजर बाबा बबन ठुबेचा ह्यलोकमतह्णने पर्दाफाश केल्यानंतर सर्व स्तरांतून बाबाविरुद्ध टीकेची झोड उठत असून त्याच्यावर कारवाई व्हावी, असा सूर आहे. बाबाने पुत्रप्राप्तीचे उपाय सुचवून त्याचा प्रचार व प्रसार करून गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंधक कायद्याचा (पीसीपीएनडीटी) भंग केल्याचा तसेच बोगस डॉक्टर कायद्यांतर्गतही कारवाईचा ठपका ठेवण्यात येत आहे.
या प्रकरणी शहानिशा करून बाबाची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. वैद्यकीय पदवी नसताना उपचार करणे चुकीचे आहे, अशा बोगस आणि भोंदू डॉक्टरांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पारनेरच्या मेजर बाबाविरुद्ध बोगस डॉक्टर कायद्यांतर्गतही कारवाई होणे गरजेचे आहे.
त्यासाठी आम्ही संबंधित पोलीस यंत्रणेकडे पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी सांगितले. अशा डॉक्टरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठीही आम्ही प्रयत्न करू, असेही ते
म्हणाले.
ग्राहकांवरही कारवाई करा
‘लोकमत’ने मेजर बाबाचा स्टिंग आॅपरेशनद्वारे पर्दाफाश केला, हे कौतुकास्पद आहे. बाबाविरुद्ध विविध कलामान्वये कारवाई होणे गरजेचे आहे. शिवाय त्याकडे दुर्लक्ष करणारे तालुका आरोग्य अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह संबंधितांवर कारवाई व्हावी. तसेच उपस्थित असणाºया महसूल अधिकाºयांविरोधातही कारवाई होणे गरजेचे आहे.
- गणेश बो-हाडे,
सामाजिक कार्यकर्ते, संगमनेर
विज्ञानाची सृष्टी मिळाली, पण दृष्टी नाही देशाला विज्ञानाची सृष्टी मिळाली, पण दृष्टी नाही. कुठे तरी ते बालपणापासूनच रुजवायला हवे. यासाठीचा कायदा, अंमलबजावणीसह जागृती गरजेची आहे. भोंदूबाबाचे जाळे वाढत आहे. अनेकदा अशा प्रकरणांत तक्रारदार पुढे येत नाही. नागरिकांनी अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये. बाबावर कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत.
- डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
अतिसेवन धोकादायक
गर्भधारणेसाठी अथवा गर्भधारणेदरम्यान कुठल्याही स्वरूपाचे औषध हे धोकादायक आहे. या उपचार प्रक्रियेदरम्यान देण्यात येणाºया औषधांमुळे अंडाशयाला सूज येते. तसेच पोटात व छातीत अतिरिक्त पाणी होऊन रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठलीही औषधे ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
- डॉ. अशोक आनंद, स्त्रीरोग तज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय
मंत्री, अधिकारीही दरबारी
धक्कादायक बाब म्हणजे शासकीय, सरकारी अधिकारी, मंत्री यांच्याबरोबर बाबाच्या दरबारी डॉक्टरही येत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पुण्यातील डॉ. शीतल पाताडे आणि डॉ. कोकाटे नावाच्या दाम्पत्याचा बाबा उल्लेख करतात. दोघेही पुण्यातील असून पाताडे या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मुल होत नाही म्हणून या डॉक्टरांनी बाबाचा दरबार गाठला. चक्क मुलासाठी औषध घेतल्याचेही बाबा सांगतात. दोघांचेही नाव बाबांच्या नोंदवहीत दडल्याचेही ते सांगतात.
एड्स बरा केल्याचा बाबाचा दावा
भाभा अणुसंशोधन केंद्राचा अधिकाºयानेही बाबांकडून एड्सवर उपचार घेतले व तो बरा झाल्याचे बाबांचे म्हणणे आहे. बाबाची कर्करोग, मधूमेह, रक्तदाब, क्षयरोग आदीसाठी औषधे देशाबाहेरही जात असल्याचेही बाबाचे म्हणणे आहे.
छायाचित्रणावरून तपास
स्टिंगदरम्यानचे छायाचित्रण, ध्वनिफितीद्वारे पुढील कारवाई होईल. बाबाच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ झाल्याचे पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतराव गाडे म्हणाले.