गर्भपात ‘रॅकेट’चा सांगलीत पर्दाफाश

By admin | Published: March 6, 2017 06:15 AM2017-03-06T06:15:20+5:302017-03-06T06:15:20+5:30

म्हैसाळ (ता. मिरज) येथे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या ‘रॅकेट’चा सांगली पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला.

Abortion racket busted in Sangli | गर्भपात ‘रॅकेट’चा सांगलीत पर्दाफाश

गर्भपात ‘रॅकेट’चा सांगलीत पर्दाफाश

Next


म्हैसाळ/सांगली : म्हैसाळ (ता. मिरज) येथे बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या ‘रॅकेट’चा सांगली पोलिसांनी रविवारी पर्दाफाश केला. म्हैसाळच्या ओढ्याजवळ गर्भपात करून दफन केलेले तब्बल १९ भ्रूण पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी बाबासाहेब खिद्रापुरे दाम्पत्याच्या म्हैसाळमधील रुग्णालयावरही छापा टाकला असून, त्यात अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या.
पोलिसांच्या धडक कारवाईची माहिती मिळताच, खिद्रापुरे डॉक्टर दाम्पत्य कुटुंबासह फरार झाले आहे. मणेराजुरी (ता. मिरज) येथील स्वाती प्रवीण जमदाडे (२५) या विवाहितेचा चार दिवसांपूर्वी डॉ. खिद्रापुरे याने गर्भपात केला होता, त्या वेळी स्वातीचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचा पती व डॉ. खिद्रापुरे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. तपासात पोलिसांना खिद्रापुरेचा अनेक वर्षांपासून बेकायदा गर्भपाताचा उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्याच्या रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रविवारी सकाळपासून म्हैसाळच्या ओढ्याजवळ जेसीबीच्या मदतीने माती खोदली. त्यात सायंकाळपर्यंत १९ भ्रूण सापडले. खिद्रापुरे (बीएचएमएस) हा स्त्रीरोगतज्ज्ञ नसतानाही त्याने महिलांचा बेकायदा गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पंचनाम्यावेळी आढळून आल्यानंतर ‘रॅकेट’चा पर्दाफाश झाला.
रजिस्टर सापडले!
गर्भपात केलेल्या महिलांची नावे असलेले रजिस्टर पोलिसांना सापडले आहे. सर्व महिलांशी पोलीस संपर्क साधणार आहेत. लिंगनिदान चाचणीनंतर मुलींचा
गर्भ असल्याचे लक्षात आल्यानंतर गर्भपात केला का? याची माहिती घेण्यात येत
आहे. (प्रतिनिधी)
>मुलींचे भ्रूण?
हे भ्रूण मुलींचे आहेत का, याची तपासणी मिरज वैद्यकीय महाविद्यालयात केली जाणार आहे. तपासणीचा अहवाल एक-दोन दिवसांत मिळेल.
गर्भ मोठा असेल
तर विल्हेवाट
गर्भपात करताना भ्रूण मोठा असल्याचे आढळून आल्यास खिद्रापुरे त्याची विल्हेवाट लावत होता. गावातच ओढ्याजवळ भ्रूणाचे दफन केले जात असे. खिद्रापुरेच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भूलतज्ज्ञाची माहिती घेत आहोत.
- दत्तात्रय शिंदे,
जिल्हा पोलीसप्रमुख

Web Title: Abortion racket busted in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.