२ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता

By Admin | Published: October 14, 2016 02:50 AM2016-10-14T02:50:34+5:302016-10-14T02:50:34+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यांसाठी वरदान असलेल्या धामणी मध्यम सिंचन प्रकल्पांच्या ७८२ कोटी ३७ लाख रुपयांच्या खर्चास

About 2 thousand crore project | २ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता

२ हजार कोटींच्या प्रकल्पास मान्यता

googlenewsNext

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यांसाठी वरदान असलेल्या धामणी मध्यम सिंचन प्रकल्पांच्या ७८२ कोटी ३७ लाख रुपयांच्या खर्चास तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी उपयुक्त अशा वारणा सिंचन प्रकल्पाच्या १ हजार १७४.९८ कोटी रुपयांच्या खर्चास राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
धामणी प्रकल्पाची १९९५-९६ मध्ये किंमत ही १२० कोटी रुपये होती. २००३-०४ मध्ये ३२० कोटी रुपयांच्या खर्चास प्रथम सुधारित मान्यता देण्यात आली होती. आता हा आकडा ७८२ कोटी रुपयांवर गेला आहे. या खर्चास मान्यता देण्याची शिफारस राज्य तांत्रिक सल्लागार समितीने केलेली होती.
आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पांच्या किमती वाढल्याची टीका सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी वारंवार केली होती. तथापि, वाढता खर्च आणि अन्य कारणांनी प्रकल्पांची किंमत वाढल्याचे वास्तव आजच्या निर्णयाने अधोरेखित झाले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणामुळे दूधगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात झालेल्या ५४२७ हेक्टर सिंचन क्षेत्रातील कपातीची पुनर्स्थापना धामणी प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. वारणा प्रकल्पाला आज तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करण्यात आला असून तो २०१९ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पातून ६३ हजार १४८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यावर ती ८७ हजार हेक्टर इतकी होईल.
१९६३-६४ मध्ये केवळ ३१.६४ कोटी रुपये खर्चाचा असलेल्या या प्रकल्पांची किंमत टप्प्याटप्प्याने वाढत गेली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: About 2 thousand crore project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.