अबब ! मळद येथे अडीच किलोंचा आंबा
By admin | Published: May 10, 2017 03:46 AM2017-05-10T03:46:36+5:302017-05-10T03:46:36+5:30
मळद (ता. बारामती) येथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : मळद (ता. बारामती) येथील तब्बल अडीच किलोचा आंबा कुतूहलाचा विषय ठरला आहे. येथील शेतकरी हनुमंत बिचकुले यांच्या शेताच्या बांधावर असणाऱ्या आंब्याच्या झाडाला हे फळ लागले आहे.
हनुमंत बिचकुले यांनी बाजारातून आणलेल्या आंब्याची कोय शेताच्या बांधावर साडेपाच वर्षांपूर्वी लावली होती. यंदाच्या वर्षी या झाडाचे हे दुसरे पीक आहे. मागील वर्षी या झाडाला केवळ दोन ते तीनच फळे आली होती. तर यंदा झाडावर १५ ते १६ फळे आहेत. सर्व फळे मोठी आहेत. रविवारी या परिसराती वादळी पाऊस झाला होती. या पावसात या झाडाचे सर्वात मोठे फळ पडले. या फळाचे वजन केले असता २ किलो ४०० ग्रॅम भरले. हे आंब्याचे झाड नैसर्गिक पद्धतीने वाढवले आहे.
या झाडाला कोणतेही खत किंवा औषध फवारले नाही, अशी माहिती हनुमंत बिचकुले यांनी दिली. या फळाची कीर्ती ऐकून माळेगाव येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्राच्या संशोधकांनी बिचकुले यांच्या शेताला भेट दिली. तसेच आंब्याच्या झाडाची व फळाची तपासनी केली. झाडाची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. दोन महिन्यांत या झाडाचे कलम करण्यात येईल.