फरार आरोपीची जन्मठेप कायम

By admin | Published: October 28, 2015 02:21 AM2015-10-28T02:21:29+5:302015-10-28T02:21:29+5:30

नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरॉलवर बाहेर पडल्यानंतर गेली सात वर्षे फरार असलेल्या एका खुनाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अपिलात कायम केली.

The absconding survivor's life imprisonment continued | फरार आरोपीची जन्मठेप कायम

फरार आरोपीची जन्मठेप कायम

Next

मुंबई : नाशिक मध्यवर्ती कारागृहातून पॅरॉलवर बाहेर पडल्यानंतर गेली सात वर्षे फरार असलेल्या एका खुनाच्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी अपिलात कायम केली.
मुंबईतील भुलाभाई देसाई रोड या श्रीमंत वस्तीतील तिरुपती अपार्टमेंटसच्या ‘आशियाना’ इमारतीत एकट्याच राहणाऱ्या रमाबेन चंद्रकांत सोमाणी या ७० वर्षांच्या विधवेचा खून केल्याबद्दल, त्याच इमारतीचा एक सुरक्षा रक्षक राजेशकुमार कुंजबिहारी द्विवेदी यास सत्र न्यायालयाने ३१ आॅगस्ट २००७ रोजी जन्मठेप ठोठावली. शिक्षा होताच राजेशकुमारला नाशिक कारागृहात हलविण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांतच म्हणजे २७ जून २००८ रोजी तो ३० दिवसांच्या पॅरॉलवर तुरुंगातून बाहेर पडला व तेव्हापासून फरार आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी फरार झाल्याचा गुन्हा तुरुंग प्रशासनाने तब्बल सात वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी नोंदविला.
आणखी गंभीर बाब अशी की, या खटल्यात सहआरोपी असलेला मायकेल चक्रवर्ती पटेल गुन्हा घडल्यापासून आजवर पोलिसांना सापडलेला नाही. थोडक्यात, दोनपैकी एक आरोपी खटला चालवायला उपलब्ध नाही व दुसऱ्याला जन्मठेप होऊनही ती भोगण्यास तो उपलब्ध नाही.
रमाबेन सोमाणी यांचा खून १७ मार्च २००३ रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान झाला होता. पोलिसांनी आरोपी राजेशकुमारला अलाहाबाद जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावातून पकडून आणले होते. या खुनाला कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता, तरी प्रामुख्याने चार परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला ठोठावलेली जन्मठेप कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्या. विजया कापसे ताहिलरामाणी व न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठाने कायम केली. (विशेष प्रतिनिधी)
राजेशकुमारचा गुन्हा सिद्ध होण्यास कारणीभूत ठरलेले परिस्थितीजन्य पुरावे असे:
रजेवर असूनही खून झाला, त्यावेळी इमारतीत जाताना व नंतर बाहेर पडताना राजेशकुमारला त्याच्या सुपरवायजरने पाहिले होते. एवढेच नव्हे, तर हटकलेही होते.
मृत रमाबेन यांच्या प्रेताच्या दोन्ही हातांच्या घट्ट आवळलेल्या मुठींमध्ये डोक्याच्या केसांचे जे पुंजके शवविच्छेदनाच्या वेळी सापडले होते, ते राजेशकुमारचेच असल्याचे रासायनिक प्रयोगशाळेत सिद्ध झाले.
रमाबेन यांच्या घरातील एका साडीवर राजेशकुमारचे व त्याच्या कपड्यांवर रमाबेन यांच्या रक्ताचे डाग आढळले.
रमाबेन यांच्या घरातून चोरीला गेलेल्या वस्तू राजेशकुमारच्या सांगण्यावरून सहआरोपीच्या घरातून हस्तगत केल्या.
काही अनुत्तरीत प्रश्न
हा निकाल लागल्यावर वकील मंडळींनी काही प्रश्न उपस्थित केले.
आरोपी स्वत: हजर झाल्याखेरीज त्याच्या जामीन अर्जावरही सुनावणी घेतली जात नाही. इथे राजेशकुमार गेली आठ वर्षे तुरुंगातून फरार आहे, असे तुरुंग प्रशासनाने कळविले होते. तरी त्याला शोधण्यासाठी काय प्रयत्न केले, याची साधी चौकशीही न करता अपिलावर सुनावणी झाली.
राजेशकुमारने तुरुंगातून फरार होण्याआधीच अपील दाखल केले होते. त्यावर अंतिम सुनावणीच्या वेळी त्याला सरकारकडून वकील दिला गेला. राजेशकुमार २००८पासून फरार आहे, तर त्यांने वकीलपत्रावर स्वाक्षरी कव्हा व कुठे केली?

Web Title: The absconding survivor's life imprisonment continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.