पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे वातावरण भीतिदायक वाटत होते - साक्षीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 12:34 AM2018-09-08T00:34:40+5:302018-09-08T00:34:58+5:30
दरवर्षी कोरेगाव भीमाला दीड-दोन लाख लोक भेट देतात. तेव्हा पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा चार-पाच लोक भेट देणार असतानाही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळ परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता.
मुंबई : दरवर्षी कोरेगाव भीमाला दीड-दोन लाख लोक भेट देतात. तेव्हा पोलीस बंदोबस्त असतो. मात्र यंदा चार-पाच लोक भेट देणार असतानाही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीस्थळ परिसरात पोलीस बंदोबस्त नव्हता. दुकाने बंद होती आणि भगवे झेंडे घेतलेला जमाव ‘जय भवानी - जय शिवाजी’ अशा घोषणा देत होता. जबरदस्ती सगळ्यांच्या कपाळावर भंडारा लावला जात होता. पोलिसांच्या अनुपस्थितीने यंदाचे वातावरण भीतीदायक वाटत होते, अशी साक्ष घाटकोपर येथे राहणाऱ्या तानाजी साबळे यांनी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला शुक्रवारी दिली.
बेस्टमध्ये वाचकाचे काम करणारे ४९ वर्षीय तानाजी साबळे २००८ पासून नेमाने कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जातात. ते घाटकोपरच्या भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य आहेत. कोरेगाव भीमा येथे त्यांनी तीन बस भरून माणसे नेली होती. ‘आम्ही सर्व आधी वळू येथे गेलो. बस वळूपासून काही अंतरावर होती. आम्ही संभाजी महाराज व गोविंद गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. मात्र यंदा येथे वातावरण भीतीदायक होते. पोलीस उपस्थित नव्हते,’ अशी साक्ष साबळे यांनी नोंदवली.
वळूवरून कोरेगाव भीमाला जाण्याचा रस्ता म्हाताºया शेतकºयाने दाखवला. तेथे जाताना नदी पलिकडच्या काठाच्या बाजूने धुराचे लोळ उठल्याचे दिसत होते. दडगफेक, जाळपोळ सुरू होती. बाईकला भगवे झेंडे लावलेले लोक मोठ्याने 'जय भवानी - जय शिवाजी' अशा घोषणा देत होते. दंगलखोरांना आवरण्याऐवजी पोलीस आम्हालाच दमदाटी करून पळवत होते, अशी माहिती साबळे यांनी मिलिंद एकबोटे यांच्यातर्फे अॅड. नितीन प्रधान यांनी घेतलेल्या उलटतपासणीत दिली. बाईकला भगवे झेंडे लावलेल्यांनी टायर जाळल्याचे किंवा त्यांनी दगडफेक केल्याचे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले का, या प्रश्नावर साबळे यांनी नकारात्मक उत्तर दिले. असा संशय असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे हे साबळे यांची उलटतपासणी घेतील. उलटतपासणी २४ सप्टेंबरपर्यंत तहकूब झाली आहे.
- घटनेचे साक्षीदार म्हणून आयोगापुढे मुंबईतील ११४ जणांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. मात्र यापैकी १० ते १२ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष आयोगापुढे नोंदविण्यात येणार आहे.