बेताल वक्तव्याने आगडोंब; टीव्हीवरून माफी मागा! नूपुर शर्मा यांना न्यायालयाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 10:23 AM2022-07-02T10:23:36+5:302022-07-02T10:24:53+5:30
वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : तुमच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देशात आगीचा भडका उडाला. देशात जे काही घडले त्यासाठी तुम्ही एकट्या जबाबदार आहेत. त्यामुळे तुम्ही आपल्या वक्तव्यांबद्दल साऱ्या देशाची टीव्हीवरूनच तात्काळ माफी मागितली पाहिजे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने देत भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना जोरदार फटकारत त्यांची याचिका सुनावणीस घेण्यास नकार दिला.
वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या नूपुर शर्मा यांच्या विरोधात विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व एफआयआर एकत्रित करण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका नूपुर शर्मा यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने नूपुर शर्मा यांना याचिका मागे घेण्यास परवानगी दिली.
या खंडपीठाने म्हटले आहे की, नूपुर शर्मा यांनी सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी किंवा राजकीय हेतूने अथवा कुटिल कारवायांचा भाग म्हणून बेताल वक्तव्ये वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केली व त्यामुळे साऱ्या देशात आगडोंब उसळला.
एका विशिष्ट धर्माबद्दल नूपुर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांविरोधात देशभरात निदर्शने करण्यात आली. तसेच या वक्तव्यांविरोधात आखाती देशांनीही संताप व्यक्त केला. त्यामुळे भाजपने नूपुर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. नुपूर शर्मा यांचे समर्थन करणाऱ्या एका टेलरची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवरही सर्वोच्च न्यायालयाचा शुक्रवारचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे.
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
- नूपुर शर्मा यांनी केलेली वक्तव्ये ही अतिशय अस्वस्थ करणारी व गर्विष्ठपणाची
- अशी वक्तव्ये करण्याचे त्यांना कारणच काय होते?
- त्यामुळे देशात अनेक दुर्दैवी घटना घडल्या.
- अशी वादग्रस्त वक्तव्ये करणारे लोक अजिबात धार्मिक नसतात. त्यांना इतर धर्मांबद्दल आदर नसतो.
- पक्षप्रवक्त्यांना वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा परवाना मिळालेला नाही
- ...तर अँकरविरोधात एफआयआर दाखल करायला हवा.
-अंथरला असेल.
वक्तव्यानंतर...
२७ मे : नूपुर शर्मा यांनी एका विशिष्ट धर्माबद्दल वक्तव्य.
१ जून : नूपुर यांच्याविरोधात तक्रार दाखल
३ जून : वादग्रस्त वक्तव्यामुळे कानपूरमध्ये हिंसाचार
४-५ जून : अनेक देशांकडून वादग्रस्त वक्तव्याचा निषेध
५ जून : नूपुर यांना पक्षातून काढून टाकण्यात आले
आम्हाला तोंड उघडायला लावू नका : कोर्ट
वादग्रस्त उद्गारांप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीला नूपुर शर्मा सर्व सहकार्य देत आहेत असे त्यांचे वकील मणिंदर सिंग यांनी सांगितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दिल्ली पोलीस करत असलेल्या तपासातून आतापर्यंत काय निष्पन्न झाले? आम्हाला आता तोंड उघडायला लावू नका. दिल्ली पोलिसांनी नूपुर शर्मा यांच्यासाठी लाल गालिचाच अंथरला असण्याची शक्यता आहे असेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.
‘ती’ वक्तव्ये आम्ही पाहिली आहेत...
शर्मा यांच्या जिवाला धोका आहे, असा युक्तिवाद त्यांचे वकील मणिंदर सिंग यांनी न्यायालयात केला होता. त्यावर नूपुर यांच्या जिवाला धोका आहे की त्यांच्यापासूनच सुरक्षेला धोका आहे असा सवालही खंडपीठाने विचारला. वृत्तवाहिनीवरील चर्चेत शर्मा यांनी केलेली प्रक्षोभक वक्तव्ये आम्ही पाहिली आहेत असेही न्यायालयाने म्हटले आहे.
पक्षप्रवक्त्यांनी वादग्रस्त विधाने करू नयेत -
एखादी व्यक्ती राजकीय पक्षाची प्रवक्ता असेल तर त्याचा अर्थ त्याला वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा परवाना मिळालेला नाही. जर वृत्तवाहिनीवरील चर्चेचा दुरुपयोग झाला असे नूपुर शर्मा यांना वाटत असेल तर त्यांनी अँकरविरोधात एफआयआर दाखल करायला हवा होता.
- न्यायालय