“मुस्लिमांची सहनशीलता म्हणजे कमजोरी नव्हे”; अबू आझमींनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 09:15 AM2022-05-15T09:15:51+5:302022-05-15T09:16:29+5:30
आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : आम्ही सहनशीलता दाखवून शांत राहतो म्हणून आम्हाला कोणी वारंवार डिवचू नये. सहनशीलता म्हणजे आमची कमजाेरी समजू नये, असा इशारा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी दिला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा भिवंडीतील अमजदिया मशीद रोड येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी आमदार रईस शेख, भिवंडी शहराध्यक्ष रियाज आझमी यांच्यासह मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
भोंगे व हनुमान चालिसा या मुद्यांचा उल्लेख न करताच महाराष्ट्रातील तमाम मुस्लीम समाजाने या वादात सहनशीलता दाखवून समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घेत शांतता बाळगली याबद्दल आझमी यांनी आभार मानले. भिवंडी शहरातील विकासकामांत पालिकेतील सत्ताधारी त्यात अडथळे निर्माण करीत असल्याचा आरोप शेख यांनी केला आहे, तर शहराध्यक्ष रियाज आझमी यांनी पाणीप्रश्नावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी राजनोली नाका ते शांतीनगर अमजदिया मशीद रोडपर्यंत बाइक रॅली काढण्यात आली.